Mumbai Crime News: एका ६४ वर्षीय व्यावसायिकावर लैंगिक अत्याचार केल्याचा खोटा आरोप करण्यासाठी एका महिलेने कोंबडीच्या रक्ताचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुंबई पोलिसांनी २०२१ मध्ये ता खटल्याच्या संदर्भात आरोपपत्र दाखल केले होते. यानुसार, मोनिका भगवान उर्फ देव चौधरी आणि तिचे साथीदार अनिल चौधरी उर्फ आकाश, लुबना वजीर उर्फ सपना, फॅशन डिझायनर आणि ज्वेलर्स मनीष सोडी, यांनी खोटे आरोप करून व्यावसायिकाकडून तब्ब्ल ३ कोटी २६ लाख रुपये उकळल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, २०२१ मध्ये, महाराष्ट्रातील कोल्हापुरातील एका व्यावसायिकाने सहार पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली की मोनिका आणि तिच्या सहकाऱ्यांनी त्याला अडकवून ३.२६ कोटी रुपये उकळले. आरोपींनी २०१९ मध्ये त्याचा एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता ज्यामध्ये ते त्याला धमकी देत होते की आपण त्याच्यावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करू. व्हिडिओचा वापर करून, त्यांनी दोन वर्षांच्या कालावधीत त्याच्याकडून पैसे उकळले.
पीडित व्यवसायिकाने सांगितला घटनाक्रम…
६४ वर्षीय व्यापारी व अनिल चौधरी यांची २०१६ मध्ये गोव्यात भेट झाली त्यावेळी त्यांनी नंबर्स शेअर केले व तेव्हापासून दोघे सतत संपर्कात होते. २०१८ मध्ये अनिलने त्यांची फॅशन डिझायनर लुबना वझीरशी ओळख करून दिली. मार्च २०१९ मध्ये, व्यापारी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबला होता, तेव्हा चौधरीने त्याला विचारले की सपना आणि मोनिका या सुद्धा जेवायला येऊ शकतात का ज्यावर त्यांनी होकार देताच सपना आणि मोनिका हॉटेलमध्ये पोहोचल्या आणि तक्रारदाराला त्याच्या खोलीत भेटल्या.
काही वेळातच सपना, हॉटेलच्या लॉबीमध्ये काही कागदपत्र द्यायची आहेत असं सांगून खोलीबाहेर आली आणि त्याचवेळी मोनिका हॉटेलच्या वॉशरूममध्ये गेली. थोड्याच वेळात कोणीतरी खोलीची दारावरची बेल वाजवली आणि व्यावसायिकाने दरवाजा उघडला तेव्हा सपनाने आरडाओरड करायला सुरुवात केली आणि तिच्या फोनवर व्हिडिओ रेकॉर्ड केला. तिने मोनिकावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला, तिने स्वत:ला बेडशीटने झाकले होते. मोनिकाच्या कपड्यांवर आणि तिने स्वतःला झाकण्यासाठी वापरलेल्या बेडशीटवरही रक्ताचे डाग होते.
घाबरलेल्या व्यावसायिकाने अनिलला बोलावून परिस्थिती सांगितली. अनिल येताच त्याने त्याच्याकडे १० कोटी रुपयांची मागणी केली की जर पैसे दिले नाही तर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करू आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करू अशी धमकीही देण्यात आली.
असे पकडले गेले गुन्हेगार…
अखेरीस, ते ७५ लाख रुपयांवर सेटल झाले परंतु तेव्हापासून त्यांनी दोन वर्षांच्या कालावधीत पीडितेकडून ३.२६ कोटी रुपये उकळले. त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये आरोपींनी पीडितेचे अपहरण करून २७ हजार रुपये आणि एक लाख रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावून घेतली होती. सततच्या खंडणी आणि ब्लॅकमेलला कंटाळून पीडित व्यावसायिकाने १७ नोव्हेंबर २०२१ रोजी सहार पोलिस ठाण्यात पोलिस तक्रार दाखल केली.
तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून सपना आणि अनिल यांना खंडणीची रक्कम स्वीकारताना अटक केली. तथापि, मोनिका पळून जाण्यात यशस्वी झाली आणि नंतर जून २०२२ मध्ये तिलाही अटक करण्यात आली.
हे ही वाचा<< ज्योती मौर्य यांच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया; ज्योती- आलोकच्या लग्नाची पत्रिका दाखवत म्हणाले, “असंच होणार कारण…”
तपासादरम्यान, असे आढळून आले की आरोपी टोळीने इतर अनेक पीडितांना ब्लॅकमेल करून खंडणी घेतली आहे. त्यांनी त्यांच्या काही पीडितांवर खोटे गुन्हेही दाखल केले होते. तपास पथकाने झडतीदरम्यान आरोपींकडून ४९.३५ लाख रुपये जप्त केले. या प्रकरणी तक्रारदाराला फसवण्यासाठी त्यांनी कोंबडीच्या रक्ताचा वापर केल्याचे सुद्धा समोर आले.
