मुंबई : मागील अनेक वर्षांत भारतात अतिवृष्टी, दुष्काळ आणि उष्णतेच्या लाटांसारख्या तीव्र स्वरुपाच्या हवामान घटनांचे हिमाचलपासून महाराष्ट्रापर्यंतच्या विविध समुदायावर गंभीर परिणाम झाले आहेत. या आव्हानांना प्रभावीपणे सामोरे जायचे असेल तर वातावरण बदल नियोजनात अधिक प्रभावी भूमिका हवी, अशी मागणी ‘महिला पंचायत नेतृत्वा’ने मुंबईत आयोजित ‘लिंगभाव आणि वातावरण बदल’ (जेंडर ॲण्ड क्लायमेट चेंज) विषयावरील चर्चासत्रात केली आहे.
यशवंतरराव चव्हाण केंद्र, रिसोर्स ॲण्ड सपोर्ट सेंटर फॉर डेव्हलपमेंट (आरएससीडी) आणि असर सोशल इम्पॅक्ट ॲडव्हायजर्स (असर) यांच्या संयुक्त विद्यमाने या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महाराष्ट्र, झारखंड आणि कर्नाटकमधील लोकनियुक्त पंचायत प्रतिनिधी, धोरणकर्ते, संशोधक आणि नागरी संस्थांचे, समुदायांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
यावेळी महिला सभांना अधिक सक्षम करणे, ग्रामपंचायत स्तरावर महिला नेतृत्वाला प्रोत्साहन देणे, वातावरण बदलाशी जुळवून घेण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद करणे आणि पंचायत प्रतिनिधींच्या कौशल्यांची क्षमताबांधणी करणे या प्रमुख शिफारसी या चर्चासत्रात करण्यात आल्या. याचबरोबर महिलांच्या नेतृत्वाखालील ग्रामपंचायती भारतातील वातावरण बदलाच्या कृतींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, हे चर्चासत्रात अधोरेखित करण्यात आले.
यावेळी विकासाच्या प्रक्रियेत पर्यावरणाचेही भान राखणे अत्यंत आवश्यक आहे असे खासदार सुप्रिया सुळे यांनी नमूद केले. राजकीय मतभेदांपलीकडे जाऊन वातावरणीय कृती ही राष्ट्रीय मोहीम म्हणून पाहिली जाईल तेव्हाच बदल घडेल. विविध राज्यांमध्ये अनेक कृती आराखडे तयार झाले आहेत. पण आपण त्यांच्या अंमलबजावणीवर किती लक्ष देतो, हा विचार करण्याचा मुद्दा असल्याचेही सुळे यांनी सांगितले.
दरम्यान, कार्यक्रमाच्या दुसऱ्या परिसंवादात धोरण व संशोधनाचा पैलू मांडण्यात आला. यावेळी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या प्राध्यापक बी. मंजुळा यांनी वातावरणीय बदलाशी संबंधित निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढविण्यासाठीच्या प्रयत्नांची माहिती दिली. वाढत्या हवामान बदलाच्या परिणामांमुळे पाणीटंचाई आणखी तीव्र होईल. या संकटावर मात करण्यासाठी ग्रामपंचायतींनी सक्रिय पावले उचलणे आवश्यक आहे, असे मत जलतज्ज्ञ सतीश खाडे यांनी व्यक्त केले.
दरम्यान, असर आणि आरएससीडी यांनी राज्यातील ५० ग्रामपंचायतीसोबत केलेल्या कामाच्या आधारे या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामपंचायतमींमध्ये महिला सभा आयोजित करणे, जल समित्यांमध्ये सहभाग वाढवणे आणि पंचायत वातावरण बदलविषयक संवादात्मक कार्यक्रमांचे आयोजन करणे आदी विविध उपक्रम राबविण्यात येतात.