काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी आणि त्यांचे पूत्र झिशान सिद्दीकी अजित पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा चालू आहेत. ही पिता-पुत्र जोडी येत्या १० फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश करेल, असा दावा काही वृत्तवाहिन्यांनी केला आहे. सिद्दीकी यांनी काँग्रेसला रामराम केला तर मुंबई काँग्रेससाठी हा मोठा धक्का असेल. झिशान आणि बाबा सिद्दीकी यांनी नुकतीच अजित पवार यांची भेट घेतली होती. या भेटीतच त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत बोलणी झाली असल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, यावर आमदार झिशान सिद्दीकी यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांसमोर स्पष्टीकरण दिलं.
झिशान सिद्दीकी म्हणाले, मी कुठल्याही पक्षात प्रवेश करत नाहीये. मी काँग्रेसमध्येच आहे. मी आणि माझ्या वडिलांनी नुकतीच अजित पवार यांची भेट घेतली होती. त्या भेटीबाबतचं वृत्त खरं आहे. परंतु, ती एक कौटुंबिक भेट होती. त्या भेटीत आम्ही राजकीय चर्चा केली नाही. आम्ही अधून-मधून अजित पवारांना भेटत असतो. मी पुन्हा एकदा स्पष्ट करतो की, मी कुठल्याही पक्षात प्रवेश करणार नाही.
अजित पवारांचं कौतुक करत झिशान सिद्दीकी म्हणाले, अजित पवारांसाठी मी मुलासारखा आहे. आमचे कौटुंबिक संबंध आहेत. माझ्यावर अन्याय होत होता, तेव्हा अजित पवारांनी माला साथ दिली, माझ्या पाठिशी उभे राहिले. अजित पवार असे नेते आहेत जे कायम तरुणांच्या पाठिशी उभे राहतात. कुठल्याही पक्षातील आमदारांसाठी रात्री २ वाजता आणि सकाळी ६ वाजतादेखील ते उपलब्ध असतात. असा दुसरा कुठलाही नेता उपलब्ध नसतो. ते खूप प्रेरणादायी आहेत.
हे ही वाचा >> “भाजपा ४०० पार कशी जाते तेच बघतो”, उद्धव ठाकरेंचं थेट आव्हान; म्हणाले, “तुमच्याकडे आलेल्या बाजारबुणग्यांचं…”
तुमच्या वडिलांनी अजित पवार गटात प्रवेश केला तर तुमची भूमिका काय असेल? असा प्रश्न विचारल्यावर झिशान सिद्दीकी म्हणाले, मी काँग्रेसमध्ये आहे आणि काँग्रेसमध्येच राहीन. परंतु, मी वडिलांबाबत भविष्यवाणी करू शकत नाही. काँग्रेस सोडून इतर कुठेही जाण्याचा माझा विचार नाही.