चंद्रपूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पक्षफोडी आणि पक्षप्रवेशांचे आयोजन मोठ्या प्रमाणात होऊ लागले आहेत. काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या गृह विधानसभा मतदार संघातील भद्रावती आणि वरोरा नगर पालिकेतील शिवसेनेच्या (उबाठा) गटाच्या १५ माजी नगरसेवकांनी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला. हे सर्व नगरसेवक लोकसभा निवडणुकीत काँग्रेस खासदार धानोरकर यांच्या प्रचारात सहभागी होते. त्यानंतर विधानसभा निवडणुकीतही ते अपक्ष उमेदवारांच्या पाठीशी उभे राहिले. या पक्षप्रवेशामुळे या दोन्ही नगर पालिकांमधे काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) जबर धक्का बसला आहे.
भद्रावती नगरपालिकेवर २०२३ पासून प्रशासक आहे. २७ सदस्यीय या पालिकेत तब्बल १७ नगरसेवक शिवसेनेचे होते. मागील पंधरा वर्षांपासून दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांचे भाऊ माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली या पालिकेवर शिवसेनेची एकहाती सत्ता होती. दरम्यान, शिवसेनेचे आमदार बाळू धानोरकर यांनी २०१९ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि लोकसभा निवडणूक लढवली. तेव्हा हे सर्व नगरसेवक आणि तत्कालीन नगराध्यक्ष अनिल धानोरकर काँग्रेसच्या प्रचारात उघडपणे उतरले. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांचाही झेंडा त्यांनी हाती घेतला.
विशेष म्हणजे, माजी मंत्री संजय देवतळे यांना शिवसेनेने उमेदवारी दिली होती, तरीही हे नगरसेवक काँग्रेसच्या प्रचारात दिसले. दरम्यान, राज्यात महायुतीचे सरकार आले आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. मात्र, अनिल धानोरकरांसह हे नगरसेवक काँग्रेसच्या मंचावर वावरताना दिसत होते. पक्षनेतृत्ताकडे त्यांच्या तक्रारी झाल्या. मात्र पक्षानेही यांच्याकडे दुर्लक्ष केले. केवळ पालिकेतील सत्ता जाऊ नये म्हणून त्यांच्यावर कारवाई केली गेली नाही. भद्रावती हा शिवसेनेचा जिल्ह्यातील गड समजला जातो. २०२२ मध्ये शिवसेनेत उभी फूट पडली आणि उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद गेले. २०२३ मध्ये भद्रावती आणि वरोरा पालिकेचा पंचवार्षिक कार्यकाळ संपल्याने प्रशासक नियुक्त झाले.
तेव्हा हे नगरसेवक फक्त कागदोपत्री शिवसेनेत होते. पण त्यांचा जीव काँग्रेसमध्येच होता. दरम्यान, खासदार बाळू धानोरकर यांचे अकाली निधन झाले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांनी निवडणूक लढवली. तेव्हाही हे नगरसेवक त्यांच्या सोबतच होते. त्यांनी धानोरकरांची साथ सोडली नाही. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीत भद्रावती-वरोरा मतदारसंघातील तिकीट वाटपावरून धानोरकर कुटुंबात फूट पडली.
अनिल धानोरकर वंचित बहुजन आघाडीकडून रिंगणात उतरले, पण त्यांना मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला. दरम्यान, याच निवडणुकीत शिवसेना (उबाठा) चे मुकेश जिवतोडे अपक्ष रिंगणात उतरले आणि त्यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली. कॅांग्रेसचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. विधानसभा निवडणुकीनंतर जिवतोडे शिंदे गटात गेले. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र शिंदे (उबाठा) यांच्याशी या नगरसेवकांचे फारसे सख्य नाही.
खासदार धानोरकर सुद्धा या माजी नगरसेवकांना विचारत नाही. त्यामुळे सुरक्षित राजकीय भवितव्याच्या शोधात असलेल्या या माजी नगरसेवकांनी जिवतोडे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटात प्रवेश केला. तआगामी नगरपालिका निवडणुकीत आता शिवसेना (उबाठा) आणि काँग्रेसला नव्याने उमेदवारांचा शोध घ्यावा लागणार आहे. त्यामुळे वरोरा-भद्रावती पालिकेच्या निवडणुकीतील राजकीय समीकरणात बरीच उलथापालथ होण्याची शक्यता आहे.
शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश
शिवसेना (शिंदे गट) चंद्रपूर लोकसभा संघटक मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वाखाली १७ जून रोजी उपमुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या माजी नगरसेवकांनी पक्षप्रवेश केला. भद्रावतीचे माजी नगराध्यक्ष प्रफुल्ल चटकी, माजी नगरसेवक सुधीर सातपुते, प्रमोद गेडाम, अनिता मुडे, राजू सारंगधर, चंद्रकांत खारकर, शोभाताई पारखी, शीतलताई गेडाम, प्रतिभाताई सोनटक्के, आशाताई निंबाळकर, प्रदीप वडाळकर यांनी शिवबंधन बांधले. वरोरा नगरपालिकेतील माजी नगरसेवक दिनेश यादव, प्रणाली मेश्राम, सुषमा भोयर तसेच वरोरा शहर संघटक किशोर टिपले यांनी धनुष्यबाण हाती घेतला. याशिवाय, वरोरा बाजार समितीचे माजी संचालक राजू आसुटकर, संदीप चौधरी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला.