अकोला : देशात २०१४ पासून भाजप आणि संघाचे विचाराचे सरकार आले. या शासनाने भारतीयांना अनेक खोटे आश्वासन दिले. सत्तेत आल्यानंतर अनेकांची मुस्कटदाबी केली. मोदींच्या हुकूमशाही वृत्तीला कंटाळून देशातील १७ लाख कुटुंबीयांनी भारत सोडला आहे, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज केला.

हेही वाचा >>> गृहमंत्र्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ‘प्रहार’च्‍या सभेला परवानगी नाकारली; अखेर जिल्हा परिषदेने…

अकोला मतदारसंघातील अकोट येथील सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर चौफेर टीका केली. पुढे ते म्हणाले, नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांचे शोषण करून मोठमोठ्या उद्योगपतींना संरक्षण दिले. मोदी सरकारने शेतकऱ्यांवर अन्याय केला. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडून मारले. आजही शेतकरी दिल्लीत आपल्या हक्कासाठी आंदोलन करीत आहेत. शेतकऱ्यावर एवढी वाईट अवस्था आजपर्यंत कोणत्याही पंतप्रधानांच्या कार्यकाळात आली नाही, असे त्यांनी नमूद केले. भारतातील लोक देश सोडून दुसऱ्या ठिकाणी का स्थायिक होत आहेत, आपल्या देशातील हुशार तरुण मुले दुसऱ्या देशात नोकरीसाठी का जातात याचा आपण गांभीर्याने विचार करायला पाहिजे. २०१४ पासून भारतातील नागरिक, शेतकरी, शेतमजूर, वंचित, शोषित, महिला हा अन्याय सहन करीत आहेत. सर्वांनी एकजुटीने हुकूमशाही वृत्तीचा विरोध करावा, असे आवाहन ॲड. आंबेडकर यांनी केले.