Scrub Typhus Symptoms: अमरावती: जिल्ह्यात ‘स्क्रब टायफस’ या आजाराने पहिला बळी घेतला असून, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जगतपूर गावातील ६५ वर्षीय शेतकरी बळी ठरले आहे. सहा रुग्ण आढळले आहेत.अमरावती जिल्ह्यात या आजाराचा फैलाव वाढू लागल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जगतपूर येथील ६५ वर्षीय शेतकरी टिरलिंग पवार यांचा डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात (पीडीएमएमसी) उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना सतत ताप येत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

तपासणीत त्यांना ‘स्क्रब टायफस’चा संसर्ग झाल्याचे निदान झाले होते. गेल्या आठवड्यात जगतपूर बेड्यावर या आजाराचा पहिला रुग्ण आढळला होता, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण आहे.

दरम्यान, जगतपूर गावातील आणखी दोन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. याव्यतिरिक्त, अचलपूर तालुक्यातील चौसाळाजवळील येसुर्णा आणि दर्यापूर तालुक्यातील दारापूर येथेही प्रत्येकी एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

येसुर्णा येथील महिला रुग्णाला पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलवण्यात आले आहे. दारापूर येथील पुरुष रुग्णावर ‘पीडीएमएमसी’मध्ये उपचार सुरू आहेत, तर जगतपूर येथील दोन रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आरोग्य यंत्रणा सतर्क; प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू

‘ओरिएंटा त्सुत्सुगामुशी’ नावाच्या जिवाणूमुळे होणारा हा आजार ‘माईट’ नावाच्या विशिष्ट कीटकाच्या चाव्यातून पसरतो. तीव्र ताप, डोकेदुखी आणि अंगदुखी ही या आजाराची मुख्य लक्षणे आहेत.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले आणि जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. शरद जोगी यांच्या नेतृत्वाखालील आरोग्य पथके जगतपूर आणि बाधित गावांमध्ये तैनात आहेत. परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

पथकांनी बाधित गावांमध्ये जलद ताप सर्व्हेक्षण आणि कीटक सर्व्हेक्षण सुरू केले आहे. झुडपांमध्ये वास्तव्य करणाऱ्या ‘माईट’ कीटकांच्या नियंत्रणासाठी टेमीफॉस आणि मॅलीथिऑन पावडरचा वापर करून कीटकनाशक फवारणी केली जात आहे. वाढलेले गवत आणि अनावश्यक झुडपे काढून टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नागरिकांनी पूर्ण बाह्यांचे कपडे वापरणे, खुल्या जागी शौचास जाणे टाळणे आणि घराजवळ स्वच्छता राखून कीटकनाशक औषधांचा वापर करणे आवश्यक आहे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरित जवळच्या आरोग्य केंद्रात तपासणी करून घ्यावी. ग्रामीण भागात अद्याप या रोगाचा फैलाव झालेला नसला तरी, नागरिकांनी योग्य काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.