बुलढाणा: राजमाता जिजाउंचे माहेर असलेल्या सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथील सकाळ खळबळ उडवणारी आणि गावात तणाव निर्माण करणारी ठरली. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलिसांचा मोठा फौजफाटा गावात दाखल करणारी ठरली. याला कारणही तसेच होते. मलकापूर पांग्रा येथील एसटी बस थांबा परिसरातील सार्वजनीक जागेत अतिक्रण करून छत्रपती संभाजी महाराज यांचा तब्बल सातफुटी पुतळा रात्रीच उभारण्यात आल्याचे दिसून आले. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनाक्रमामुळे गावात तणावाचे वातावरण आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गावात तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. मेहकरचे उप विभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, साखर खेर्डा पोलीस ठाण्याचे ठाणेदार गजानन करेवाड गावात दाखल होत घटनास्थळाची पाहणी केली. रहिवाशांची समजूत घालून पुतळ्याला भगव्या कापडाने झाकण्यात आले आहे.

मलकापूर पांग्रा येथे बस थांबा परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारील खुल्या जागेत २५ एप्रिलच्या मध्यरात्रीनंतर अज्ञातांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसवला. उजव्या हातात तलवार व डाव्या हातात म्यान असलेला तपकीरी, विटकरी रंगाचा पूर्णकृती पुतळा लोखंडी स्टँडवर स्थापन करण्यात आला. आज सकाळी जागे झालेल्या ग्रामस्थांना पुतळा पाहून धक्काच बसला. याची माहिती वेगाने पसरताच तिथे एकच गर्दी उसळली.

माहिती मिळताच साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन करेवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लोकांशी चर्चा करून समजूत घातली. ग्रामपंचायत अधिकारी उद्धव गायकवाड यांनी अनधिकृत पुतळा बसवण्याची तक्रार दिली त्यावरून साखरखेर्डा पोलिसांनी ज्ञात आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता ३२९ (३), ३(५) पुतळा पवित्रभंगास प्रतिबंध कलम ११ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या गंभीर घटनेचा पुढील तपास बीट जमादार निवृत्ती पोफळे हे करीत आहेत

सन्मानपूर्वक पुष्पहार अर्पण करून पोलिसांनी पुतळ्याला सुरक्षिततेसाठी झाकून ठेवले. महापुरुषांचा सन्मान करण्यासाठी प्रदीप पाटील यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा जो पुतळा बसवला आहे, त्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर पुतळा उभा करण्यासाठी जोपर्यंत रितसर परवानगी येत नाही तोपर्यंत पुतळ्याला कापडामध्ये बांधून ठेवण्यात आले आहे. त्या ठिकाणी सुरक्षिततेसाठी सरंक्षक कुंपण करून टिनपत्रे लावण्यात आली. बसवलेल्या जागेपासून पुतळा सुरक्षिततेच्या कारणासाठी हलविला. ज्या ठिकाणी पुतळा उभारला होता त्या ठिकाणी काढून तो थोडा मागे घेण्यात आला.

पुतळा हलवू नका, आहे त्या ठिकाणी असू द्या, अशी मागणी काही जणांनी केली, तर पुतळा ज्या ठिकाणी उभारला त्याच्या सुरक्षेचे काय, असा प्रश्न काहींनी उपस्थित केला. गावात सध्या शांतता असला तरी तणाव आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 7 foot statue of sambhaji maharaj was set up overnight case filed against unknown persons buldhana nagpur scm 61 dvr