नागपूर : कुटुंबियांचा विरोध झुगारून प्रेमविवाह करण्यासाठी राजस्थानवरून एक प्रेमीयुगुल नागपुरात पळून आले. एका मित्रांने लग्न लावून देण्याचे आमिष दाखवून तरुण-तरुणीचे अपहरण केले. फार्महाऊसवर डांबून मारहाण करीत १२ लाख रुपयांची खंडणी मागितली. सदर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही खळबळजनक घटना घडली आहे.
विनीत टाक (वय २९, नागोर, राजस्थान) असे तक्रारदार तरुणाचे नाव आहे. त्याची प्रेयसी हीदेखील राजस्थानमधीलच असून, वेगवेगळ्या धर्मांचे असल्यामुळे त्यांच्या लग्नाला विरोध होता. त्यामुळेच त्यांनी पळून जाऊन लग्न करण्याचे ठरविले. विनीत अगोदर हैदराबादमध्ये कार्यरत होता व तेथून येताना रेल्वेत त्याची मोहम्मद समीर ऊर्फ सॅम खान (जाफरनगर) याच्यासोबत ओळख झाली होती. दोघेही नियमित संपर्कात होते. विनीतने लग्न करण्याबाबत त्याला माहिती दिली व समीरने नागपुरात लग्न लावून देतो असे सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून विनीत व त्याची प्रेयसी माऊंट अबू, अहमदाबादमार्गे १८ ऑगस्ट रोजी नागपुरात आले. ते सदरमधील एका हॉटेलमध्ये थांबले होते. २२ ऑगस्ट रोजी सायंकाळनंतर लग्नाचा चांगला मुहूर्त असल्याचे समीरने त्यांना सांगितले. त्याने रात्री साडेआठ वाजता एक कार पाठविली. कारच्या ड्रायव्हरने लग्नाचा मंडप काही मिनिटांच्या अंतरावर असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात तो त्यांना एका फार्म हाऊसवर घेऊन गेला. तेथे समीरसोबत त्याचे सहकारी जिशान (२७), सुल्तान (२५), आरीफ (२५) व आणखी एक तरुण होता. तेथे पोहोचताच आरोपींनी विनीतला बेदम मारहाण केली व त्याच्या खिशातून ८ हजार रुपये काढले. त्यानंतर त्यांनी त्याला प्रेयसीपासून दूर बसविले. रात्रभर दोघांना फार्महाऊसमध्ये वेगवेगळे बंद करण्यात आले व प्रेयसीच्या रडण्याचा आवाज येत होता.
हे ही वाचा… नागपुरात पदभरती परीक्षे दरम्यान महिलांचा गोंधळ… कारण काय?
दुसऱ्या दिवशी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास आरोपी त्याच्या प्रेयसीला (एमएच ४९ एएस ६५१२) या कारमध्ये जबरदस्ती घेऊन गेले. तेथे उपस्थित असलेल्या एका आरोपीने विनीतला १२ लाख रुपये खंडणी मागितली. त्यानंतर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आरोपींनी विनीतला सोडले व नागपुरातून निघून जाण्याबाबत बजावले. हादरलेल्या विनीतने सदर पोलिस ठाणे गाठले व आपबिती सांगितली. पोलिसांनी आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १२७(२), १४०(१), ६१ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपींचा शोध सुरू आहे.
हे ही वाचा… चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक म्हणतात, पास्कोच्या गुन्ह्यात वाढ, पण…
प्रेयसी पोहोचली गावात
प्रियकर आरोपींच्या तावडीतून कसाबसा सुटल्यानंतर त्याने थेट सदर पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांना सर्व प्रकार सांगितला. दरम्यान, आरोपींनी त्याच्या प्रेयसीलासुद्धा मारहाण केली आणि तिला रस्त्यात सोडले. तिलादेखील गावी परत जाण्याबाबत बजावले. घाबरलेली तरुणी राजस्थानमधील गावाकडे निघून गेली. सदर पोलीस ठाण्याच्या पथकाने चौकशी केली असता ती सुखरूप पोहोचली असल्याची बाब समोर आली.