चंद्रपूर : लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदारांच्या टक्केवारीत या जिल्ह्यात भ्रष्टाचार हा या सर्वांच्या अंगवळणी पडला आहे. या भ्रष्टाचारामुळे सर्वत्र निकृष्ट दर्जाची कामे सुरू असून तीन दिवसांपूर्वी जनता महाविद्यालय चौकात सेव्हन स्टार बेकरीसमोरील नालीवर बांधकाम केलेले चेंबर कोसळल्याने एक व्यक्ती नालीत पडून गंभीर जखमी झाला. या घटनेचा व्हीडीओ समाज माध्यमावर सार्वत्रिक झाला आहे.

चंद्रपूर जिल्हा शहर कॉग्रेस समितीचे जिल्हाध्यक्ष रामू तिवारी यांनी हा व्हीडीओ समाज माध्यमावर सार्वत्रिक करतांना चंद्रपूर जिल्ह्यात भ्रष्टाचाराची पातळी आता इतकी खाली गेली आहे की नागरिकांच्या जीवावर बेतू लागली आहे असा आरोप केला आहे. चंद्रपूर महापालिकेच्या हद्दीत जनता महाविद्यालय चौकातील सेव्हन स्टार बेकरीसमोर सार्वजनिक बांधकाम विभागाने अलीकडेच नालीवर चेंबर बांधले आहे.

पण हे काम इतक्या निकृष्ट दर्जाचे झाले की एक व्यक्ती या चेंबरवर येवून फक्त काही सेकेंद उभा राहत नाही तोच चेंबर अक्षरशः कोसळले आणि त्यावरून जाणारा अज्ञात व्यक्ती थेट खड्ड्यात पडला आणि गंभीर जखमी झाला. ही घटना म्हणजे बांधकाम विभागातील लाचखोरी, कमिशनखोरी आणि भ्रष्ट कारभाराची थेट साक्ष आहे असेही कॉग्रेस अध्यक्ष तिवारी यांनी म्हटले आहे. करदात्यांचे पैसे उधळून असे ‘कागदी बांधकाम’ करून नागरिकांच्या सुरक्षेशी खेळ केला जातोय.

भ्रष्ट अधिकाऱ्यांना आणि ठेकेदारांना आता अजून कोणता पुरावा दाखवावा लागणार आहे?. दरम्यान आम आदमी पक्षानेही हा व्हीडीओ समाज माध्यमावर सार्वत्रिक करित भ्रष्टाचारची पोलखोल केली आहे. सर्वच विभागात हा भ्रष्टाचार नित्याचा झाला असून त्यामुळे कामांची प्रत खालावली आहे. दरम्यान या दुर्दैवी घटनेनंतर सोशल मीडियावर तसेच काही स्थानिक माध्यमांमध्ये “सदर चेंबर हे चंद्रपूर महापालिकेच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाचे उदाहरण” म्हणून सादर करण्यात आले आहे. मात्र, चंद्रपूर महापालिकेतर्फे स्पष्ट करण्यात येते की, ही माहिती पूर्णपणे अपुरी व दिशाभूल करणारी आहे.

सदर रास्ता हा राष्ट्रीय महामार्ग असून रस्त्याची देखभाल, दुरुस्ती ही त्यांच्या मार्फतच करण्यात येते. सदरील चेंबरचे बांधकाम हे मनपाने केलेले नसून कुणामार्फत करण्यात आले आहे याची मनपाकडे नोंद नाही. त्यामुळे या घटनेचा महापालिकेशी कोणताही थेट संबंध नाही असेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे घटनेची पूर्ण माहिती न घेता महापालिकेला लक्ष्य करणे हा प्रकार चुकीचा असून नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच नागरिकांनी सोशल मीडियावरील अपुरी व दिशाभूल करणारी माहिती तपासून न पाहता प्रसारित करू नये, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात येत आहे.