नागपूर : संवेदनशील, आत्मभान असणारी नवी पिढी निर्माण व्हावी – फडणवीस

सध्याची पिढी ही आत्मकेंद्रित झाली असून आपला इतिहास विसरणाऱ्या पिढीला स्वातंत्र्याचे मोल कळत नाही.

नागपूर : संवेदनशील, आत्मभान असणारी नवी पिढी निर्माण व्हावी – फडणवीस
( उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस )

सध्याची पिढी ही आत्मकेंद्रित झाली असून आपला इतिहास विसरणाऱ्या पिढीला स्वातंत्र्याचे मोल कळत नाही. त्यामुळे देशाप्रती संवेदनशील असणारी, आत्मभान असणारी नवी पिढी निर्माण करण्यासाठी विभाजन विभीषिका स्मृती दिवस पाळला जात असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्यानिमित्त जिल्हा प्रशासन व जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात फाळणी व वेदना या विषयावर आयोजित विभाजन विभीषिका प्रदर्शनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार आशीष जायस्वाल, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी प्रसन्ना-बिदरी, मनरेगा आयुक्त शंतनू गोयल, जिल्हाधिकारी विमला आर., महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. आणि ज्येष्ठ पत्रकार गजानन निमदेव उपस्थित होते.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा सरकारी नव्हे, सामाजिक उपक्रम झाला पाहिजे. खरे म्हणजे, आज आपण विभीषिका यासाठी पाळायला हवी कारण, जो समाज इतिहास विसरतो त्याला वर्तमानही असत नाही आणि भविष्यही असत नाही. चांगल्या इतिहासाची पुनरावृत्ती झाली पाहिजे. पण जे वाईट झाले ते पुन्हा होऊ नये यासाठी आजचा दिवस आहे. विभाजनाच्या बिजापोटी राष्ट्राचे तुकडे झाले. देश विभागला जाणे ही असह्य वेदना असते. फाळणीने अखंड भारत तोडला आहे. त्यामुळे ही परिस्थिती पुन्हा उद्भवू नये, भेदभाव दूर करून संघटित भारत उभारण्यासाठी आजची विभीषिका आपण पाळत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी शेषराव विश्वनाथ मुरकुटे, वसंतकुमार अनंतकुमार चौरसिया, महादेव किसन कामडी, यादवराव देवगडे, गणपतराव कुंभारे या स्वातंत्र्य सैनिकाचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता शेलगावकर यांनी केले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
नागपूर : ‘आपली बस’च्या ताफ्यात १७ ई-बस
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी