बुलढाणा : गलेलठ्ठ वेतन आणि भरपूर वर कमाई असताना काही कर्मचाऱ्यांना पैश्याचा मोह कसा नडतो याचे मासलेवाईक उदाहरण सिंदखेड राजामधील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईने समोर आले! सेवानिवृत्तीला अवघे दोन महिना बाकी असणाऱ्या तलाठीला लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे. त्याचबरोबर एक महसूल सहायक देखील अडकला आहे. दोन कर्मचाऱ्याना लाच घेताना एकाच वेळी पकडण्यात आल्याने सिंदखेड राजा तहसील कार्यलयासाह जिल्ह्याच्या महसूल वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. २४ जून रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे.
सिंदखेडराजा तहसील कार्यालय अंतर्गतच्या खापरखुटी सांझ्याचे तलाठी आणि तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक अँटीकरप्शनच्या जाळ्यात अडकले. शेत जमिनीच्या प्रकरणात सात हजार रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडून त्यांना गजाजाड करण्यात आले आहे. यातही उल्लेखनीय म्हणजे लाचखोर तलाठीच्या सेवानिवृत्तीला अवघे दोन महिने सात दिवस बाकी असताना अति पैशाच्या मोहापायी हव्यासापोटी गजाआड व्हावे लागले.
मौजे तांदुळवाडी शिवार ता. सिंदखेडराजा येथील गट नं. २४ मधील तक्रारदार व त्यांचे भावाचे नावावरील जमीन महाराष्ट्र जमीन महसुल संहीता १९६६ कलम ८५ (२) प्रमाणे जमिनीचे आपसात वाटणी करून तकारदार यांच्या आईचे नाव ७/१२ उताऱ्यावर लावण्याबाबत तहसिलदार सिंदखेडराजा यांचेकडुन आदेश करून देण्यासाठी आरोपी तलाठी रावसाहेब काकडे यांनी ७ हजार रुपये देण्यासाठी प्रोत्साहन दिले व आरोपी महसुल सहायक मनोज झिने याने ७ हजार रुपये लाचेची मागणी करून ती रक्कम स्वीकारली. त्याला लाच रक्कम स्विकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे. त्याच्या विरुद्ध सिंदखेड राजा पोलीस ठाणे येथे कलम ७, १२ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक अमरावती परिक्षेत्र मारुती जगताप अप्पर पोलीस अधीक्षक, अमरावती, परिक्षेत्र अमरावती सचिन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस उपअधीक्षक भागोजी चोरमले, पोलीस निरीक्षक, बुलढाणा रमेश पवार, यांनी मार्गदर्शन केले. कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक शाम भांगे, पोलीस हवालदार प्रविण वैरागी, राजेंद्र क्षिरसागर, आदी पोलीस सहभागी होते.