चंद्रपूर: राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर चंद्रपूर येथे गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्र स्थापन करण्यासाठी तब्बल ४१४.७४ कोटींचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मान्यता देत पुढील कार्यवाहीसाठी सकारात्मक आश्वासन दिले. हा प्रस्ताव लवकरच मंत्रीमंडळासमोर मंजुरीसाठी ठेवण्यात येणार असून, या निर्णयामुळे चंद्रपूरसह विदर्भातील हजारो विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची नवी दारे खुली होणार आहेत.
मुनगंटीवार यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आभार मानले आहेत. या निर्णयामुळे शैक्षणिक विकासाला ऐतिहासिक गती मिळेल, असा ठाम विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. प्रयत्नात सातत्य असेल तर यश हमखास मिळते, या उक्तीवर विश्वास ठेवून आ. मुनगंटीवार यांच्या अथक प्रयत्नातून आता चंद्रपूरमध्ये गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्र वास्तवात येण्याची दारे खुली झाली आहेत.
सन २०२५ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुनगंटीवार यांनी चंद्रपूर येथे गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्र स्थापन करण्याच्या विषयावर विधानसभेत जवळपास अर्धा तास सविस्तर चर्चा केली होती. या चर्चेत त्यांनी चंद्रपूर जिल्ह्याचे भौगोलिक महत्त्व, विदर्भातील विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या शैक्षणिक अडचणी आणि त्यातून निर्माण होणारे आर्थिक-सामाजिक प्रश्न यांचा परखड ऊहापोह केला होता.
तसेच चंद्रपूर येथे उपकेंद्राची आवश्यकता अधोरेखित करताना, त्यातून स्थानिक विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या नव्या संधी, शैक्षणिक दर्जा उंचावणे आणि विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी होणारे दूरगामी परिणाम यांची ठोस मांडणी केली होती. जनतेच्या हिताचे प्रश्न मांडण्यासाठी आणि त्यांचे समाधान करण्यासाठी मुनगंटीवार यांनी नेहमीच पोटतिडकीने संघर्ष केला आहे.
गडचिरोली येथे गोंडवाना विद्यापीठाची निर्मिती
आ.सुधीर मुनगंटीवार यांनी यापूर्वी, चंद्रपूर-गडचिरोली या आदिवासीबहुल जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासासाठी ३० मार्च २००७ रोजी विधानसभेत नागपूर विद्यापीठाच्या विभाजनातून स्वतंत्र गोंडवाना विद्यापीठ स्थापन करण्याचा अशासकीय ठराव मांडला होता. नंतर त्यांनी तारांकित-अतारांकित प्रश्न, कपात सूचना अशा संसदीय आयुधांच्या माध्यमातून पाठपुरावा केला आणि पत्रव्यवहार केला. या संसदीय संघर्षाच्या फलस्वरूप २०११ मध्ये गडचिरोली येथे गोंडवाना विद्यापीठाची निर्मिती झाली.
संसदीय आयुधांचा उपयोग अन् पाठपुरावा
संसदीय आयुधांचा उपयोग करून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा नामविस्तार केला. वैराग्यमूर्ती गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा नामविस्तारही आ.सुधीर मुनगंटीवार यांनी केला.पुणे विद्यापीठाला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यासाठी मोठे यश आ. मुनगंटीवार यांना मिळाले.