वर्धा : मेघे अभिमत विद्यापीठ व प्रसिद्ध अदानी उद्योगसमूह यांच्यातील करारावर गुरुवारी शिक्कामोर्तब झाले. आणि शंकांचा धुरळा शांत झाला. विद्यापीठाचे संस्थापक व ज्येष्ठ नेते दत्ता मेघे हे या औपचारिक करार प्रक्रियेचे साक्षी राहले. नेमके काय, हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे. कारण अधिकृत निवेदनात सामाजिक करार असा शब्द प्रयोग झाला आहे. त्याचा अर्थ भल्याभल्यांना लागत नाही. म्हणूनच तर्क वितर्कास उधाण आले आहे.

एक तर्क असा की अदानी हे गडचिरोली चंद्रपूर येथील प्रस्तावित खाणी घेण्याच्या तयारीत आहे. खाण मालकास १०० किलोमीटर परिसरात स्वतःचे हॉस्पिटल तयार ठेवण्याचा नियम आहे. म्हणून अदानी यांनी भागीदारी केली असावी, असे बोलल्या जाते. मात्र अशी कुठलीच तरतूद नसल्याचे एका वरिष्ठ खनिकर्म अधिकाऱ्याने नमूद केले. खनिकर्म  संचालक कार्यालयाच्या नियमावलीत ही बाब नसल्याचे अधिकारी स्पष्ट करतो. दुसरी बाब म्हणजे मेघे उद्योग समूहात अदानी यांचा फंड मिळावा, म्हणून त्यांना वैद्यकीय कारभारात सहभागी करण्यात आले. कारण अदानी यांचे मुंबई, भुज व अहमदाबाद येथे हॉस्पिटल्स असून या ठिकाणी मेडिकल कॉलेज सूरू करण्यासाठी त्यांना अभिमत विद्यापीठ आवश्यक ठरले होते.

पण एक बाब निश्चित अशी समोर आली की अदानी कुटुंबाचे विश्वासू समजले जाणारे व त्यांच्या फॉउंडेशनचे संचालक डॉ. मलय महादेवीया यांना मेघे संस्थेत कोषाध्यक्ष म्हणून घेण्यात आले आहे. एका वरिष्ठने यांस दुजोरा दिला. त्यामुळे हे विद्यापीठ आता दोघांच्या मालकीचे होणार. दत्ता मेघे हेच कुलपती राहणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. देशात वैद्यकीय क्षेत्रात खूप काम करण्याची संधी आहे. विदेशातील वैद्यकीय संस्थांच्या तोडीस तोड हे विद्यापीठ करण्याचा अदानी समूहाचा मानस आहे. या विद्यापीठास देश पातळीवार उच्च मानांकन लाभले आहे. असे रेडिमेड बॅनर घेत वैद्यकीय विस्तार करण्याचे धोरण असून एम्स सारखी देशात २५ वैद्यकीय महाविद्यालये पुढील काळात स्थापन करण्याचे उद्दिष्ट आहे.  फॉउंडेशनच्या अध्यक्ष डॉ. प्रीती अदानी यांनी या करारप्रसंगी ऑनलाईन सहभागी होत सर्वांना सन्मानपूर्वक आरोग्य सेवा देण्याचा मानस असल्याचे मत व्यक्त केले. विकसित भारताचे ध्येय पूर्ण करण्यासाठी एक स्केलेबल मॉडेल आम्ही तयार करू, अशी भूमिका प्रीती अदानी यांनी मांडली. त्यामुळे मेघे विद्यापीठ हे पुढील काळात देशाच्या वैद्यकीय शिक्षण व आरोग्य सेवेचे हब ठरणार. अमेरिकेतील मेयो क्लिनिक ( भारतातील उच्चभ्रू  तसेच राजकीय नेते जिथे उपचारास जातात. ) सोबत करार प्रस्तावित आहे.

पण आमचे काय, असा प्रश्न संस्थेच्या वरिष्ठ तसेच कर्मचाऱ्यांना पडला होता. त्याचे शंकनिरसन खुद्द सागर मेघे यांनी गुरवारच्या सभेत करून टाकले. मी संस्थेत आहेच. काळजी नसावी. तुमच्या हाकेला मी केव्हाही हो देणार. आपल्याच संस्था सांभाळायची आहे. त्यामुळे निश्चिन्त असा. सर्व चांगल्यासाठीच होणार, असे सागर मेघे यांनी नम्रपणे  विषद केले आणि उपस्थितांच्या टाळ्या पाडल्या. अदानी समूहाचा सामाजिक उत्तरदायित्व निधी आता मोठ्या प्रमाणात ईथे उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे अदानी – मेघे करार पुढील काळात अधिक उत्सुकतेचा ठरणार आहे.