यवतमाळ : जवळपास दशकानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. आता पक्षांतर्गत वाद बाजूला ठेवून पक्षविस्ताराकडे लक्ष द्या. आपली सत्ता आहे, यामुळे लोकांची कामे करा. स्थानिक कामे दर्जेदार व्हावी यावर लक्ष ठेवा, असा सल्ला देत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे कान टोचले.
ते आज, गुरुवारी स्थानिक पोस्टल मैदान येथे आयोजित माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा काँग्रेसचे नेते प्रवीण देशमुख यांचा पक्षप्रवेश सोहळा व कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. यावेळी राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आमदार संजय खोडके, अमोल मिटकरी, प्रदेश उपाध्यक्ष वसंत घुईखेडकर, प्रवीण देशमुख, अरुण राऊत, क्रांती धोटे राऊत, नाना गाडबैले, अशोक घारफळकर, जिल्हाध्यक्ष क्रांती कामारकर, माजी नगरसेवक दिनेश गोगरकर, विवेक देशमुख आदी उपस्थित होते.
पक्षात नव्याने येणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा मानसन्मान राखला जाईल. नव्या, जुन्या पदाधिकाऱ्यांचा मेळ घालून नव्याने पक्षबांधणी केली जाईल. आता थांबू नका, पक्षवाढीसाठी दौरे करा, लोकांची कामे करा, त्यांच्या अडीअडचणी सोडवा, सर्वांचा आदर करा, वाद घालू नका, अशा सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या.
पक्षसंघटन वाढविण्यासाठी नाईक परिवाराची भूमिका जिल्हात महत्त्वाची होती. यामुळे नाईक परिवाराबद्दल नागरिकांच्या मनात प्रेम, आदर आहे. तोच वारसा इंद्रनील यांनी पुढे चालवावा. तुम्ही तरुण आहात, मंत्री आहात. यामुळे दौरे करून पक्षाचे काम करा, सर्वांचा आदर करा, अशा शब्दांत त्यांनी राज्यमंत्री नाईक यांचे कान टोचले. निधी वाटपात दुजाभाव होऊ दिला जाणार नाही. यासाठी पालकमंत्री संजय राठोड, राज्यमंत्री नाईक यांची बैठक घेणार असल्याचे पवार म्हणाले.
पक्षात दुसऱ्यांदा प्रवेश घेतलेले प्रवीण देशमुख यांनी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने बेंबळाच्या उपवितरीकेतून शेवटच्या शेतकऱ्यांना पाणी कसे मिळेल, याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. कळंब तालुका क्रीडा संकुलाचा प्रश्नही लवकरच सोडविला जाणार असल्याचेही पवार यांनी सांगितले. शेतकऱ्यांना पाणंद रस्ते आवश्यक असल्याची मागणी देशमुख यांनी केली होती. त्या अनुषंगाने पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देऊन सर्व भागातील पाणंद रस्ते करण्याबाबत सूचना देणार असल्याचेही पवार म्हणाले.
यावेळी बोलताना देशमुख यांनी, राजकारणात जी पदे मिळाली ती अजित पवार यांच्यामुळेच मिळाली आहे. यानंतरही काही कारणामुळे पक्ष सोडावा लागला. आता पुन्हा त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. आता कोणतीही मागणी न ठेवता त्यांच्या नेतृत्वात काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी देशमुख यांच्यासह काँग्रेसमधील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पावसामुळे कार्यक्रमात गोंधळ झाला. उपमुख्यमंत्री पवार यांनी शासकीय बैठक आदी कार्यक्रम रद्द करून केवळ कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थिती दर्शविली.
