अकोला : गुजरातमधील आरोपींनी शेअर मार्केटमधून नफा मिळवून देण्याच्या नावावर अकोल्यातील वयोवृद्ध व्यक्तीची तब्बल ६४ लाख ५० हजारांनी फसवणूक केली होती. या प्रकरणी अकोला सायबर सेल पोलिसांनी सखाेल तपास करून गुजरातमधील दोन आरोपींना अटक केली आहे.
७ फेब्रुवारी २०२४ रोजी डॉ. जयंतीलाल दुल्लभजी वाघेला (७६, रा. सिव्हिल लाइन, अकोला) यांनी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. अज्ञात व्यक्तीने भ्रमधध्वनीवरून संपर्क साधत शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्याला ते बळी पडले. डॉ. वाघेला यांनी ६४ लाख ५० हजार रुपयांची गुंतवणूक केली.
अपेक्षित नफा मिळाला नाही आणि अधिक रक्कम गुंतवण्याचा दबाव टाकल्या जात होता. फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिल्यावर आरोपींविरूद्ध कलम ४०६, ४१९, ४२०, ३४ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास सायबर सेलकडे वर्ग केला.
सायबर पोलिसांनी सखोल तपास करताना फिर्यादीचे ६.४१ लाख गोठवले आणि न्यायालयाच्या आदेशानुसार ४.५० लाखांची रक्कम परत मिळवून दिली. सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सागर फेरण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुजरातमधील अहमदाबाद येथून स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपी कांझीकुमार वल्लभभाई गुडालिया (२८) व चिराग भरतभाई गुडालिया (२६) यांना अटक केली.
आरोपींना अकोल्यात आणून न्यायालयापुढे हजर करण्यात आले. त्यांना १५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलच्या सहायक पोलीस निरीक्षक मनीषा तायडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.
पोलिसांकडून दारूचा अवैध साठा जप्त
अकोला पोलिसांच्या ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस निरीक्षक शंकर शेळके निर्देशानुसार रामदासपेठ येथील गुरुद्वारासमोरून आरेापी नरेश श्रीकृष्ण तेलगोटे (वय २४ वर्ष, रा.मच्छी मार्केट, अकोट फैल, अकोला) याला ताब्यात घेतले. त्याच्या जवळून दुचाकी व दारूचा अवैध साठा असा एकूण ८५ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी विरुद्ध कलम ६५ (ई) महाराष्ट्र दारू बंदी कायाद्यान्वये रामदास पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत अवैध व्यवसायावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न पोलिसांकडून केले जात आहेत.