अकोला : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगर पालिका व नगर पंचायतींच्या निवडणुकीत नेतृत्वाचा कस लागणार आहे. जिल्ह्यातील पाचपैकी तीन नगर पालिकांवर भाजपचा झेंडा, तर दोन ठिकाणी काँग्रेसचा नगराध्यक्ष होता. आता ते वर्चस्व कायम राखण्याचे आव्हान भाजप व काँग्रेसपुढे राहणार आहे. इतर पक्षांपुढे अस्तित्वाचा प्रश्न राहील. युती व आघाड्या न झाल्यास जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी बहुरंगी लढतीचे संकेत आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली. जिल्ह्यातील पातूर नगर पालिकेची निवडणूक प्रक्रिया न्यायलयीन प्रक्रियेमुळे प्रलंबित ठेवण्यात आली. उर्वरित अकोट, तेल्हारा, मूर्तिजापूर, बाळापूर नगर पालिका आणि हिवरखेड व बार्शीटाकळी नगर पंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास आजपासून सुरुवात झाली. १७ नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. सध्या सर्वच पक्षांमध्ये उमेदवार निवडीवरून काथ्याकूट सुरू आहे. मुलाखतींच्या माध्यमातून संभाव्य उमेदवारांची चाचपणी झाली. युती व आघाडीचे चित्र अस्पष्ट असल्याने सर्वच पक्षांनी स्वबळावर तयारी केली आहे. भाजपमध्ये नगराध्यक्ष व सदस्य पदांच्या उमेदवारीसाठी इच्छुकांची प्रचंड गर्दी दिसून येते. निघालेल्या आरक्षणानुसार सर्वमान्य उमेदवार देतांना पक्ष नेतृत्वाला चांगलीच कसरत करावी लागणार आहे. काँग्रेसमध्ये सुद्धा नगराध्यक्ष पदासाठी इच्छुकांमध्ये स्पर्धा रंगली आहे. वंचितनेही इच्छुकांकडून अर्ज मागवले आहेत. उमेदवारांची निवड प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली. दोन्ही राष्ट्रवादी व शिवसेनेने देखील आपआपल्या पातळीवर तयारीला वेग दिला.

भाजपने स्थानिक निवडणुकीसाठी जिल्हा प्रभारी म्हणून आमदार रणधीर सावरकर यांच्यावर जबाबदारी दिली आहे. पक्षाचे प्राबल्य कायम राखण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. भाजपचे अकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे व मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांच्या दृष्टीने देखील स्थानिक निवडणुका महत्त्वाच्या ठरणार आहेत. विधानसभेत मिळवलेले यश स्थानिक स्तरावर कायम राखण्याचे आव्हान त्यांच्यापुढे राहील. बाळापूरमध्ये काँग्रेसपुढे सत्ता कायम राखण्याचे लक्ष्य असेल. ज्येष्ठ नेते प्रकाश तायडे यांच्यावर बाळापूरमधील काँग्रेसच्या कामगिरीची भिस्त राहील. विधानसभेच्या तोंडावर काँग्रेसचे माजी आमदार खतीब यांनी वंचितचा झेंडा खांद्यावर घेतला होता. विधानसभेत पराभव झाल्यानंतर आता किमान नगर पालिका निवडणुकीत तरी त्यांच्याकडून पक्षाला अपेक्षा राहतील. बाळापूरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नितीन देशमुख सलग दुसऱ्यांदा आमदार राहिल्याने त्यांच्यासाठी सुद्धा येथील निवडणूक प्रतिष्ठेची ठरेल. जिल्ह्यात सहाही ठिकाणी तुल्यबळ लढतीचे संकेत आहेत.

सहा नगराध्यक्षांसह १४२ जागा; यापूर्वी कुणाचे वर्चस्व?

अकोट नगर पालिकेमध्ये नगराध्यक्षांसह ३५ जागांसाठी निवडणूक होत आहे. नगराध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी आरक्षित आहे. नऊ नर्षांपूर्वी या ठिकाणी भाजपने झेंडा फडकावला होता. मूर्तिजापूर नगर पालिकेच्या नगराध्यक्ष आणि २५ सदस्य जागांसाठी निवडणूक होईल. मूर्तिजापूर येथे सुद्धा भाजपचे नगराध्यक्ष होते. बाळापूर नगर पालिकेचे अध्यक्ष व २५ सदस्य निवडले जाणार असून गेल्या वेळेस नगराध्यक्ष पदावर काँग्रेसने विजय मिळवला होता. तेल्हारा नगर पालिकेच्या नगराध्यक्षांसह २० जागांसाठी निवडणूक होत आहे. येथे भाजपची सत्ता होती. हिवरखेड नगर पंचायत नव्याने निर्माण झाली. अध्यक्षांसह २० सदस्य निवडले जातील. बार्शीटाकाळी नगर पंचायतमध्ये सुद्धा प्रथमच निवडणूक होणार असून अध्यक्ष व १७ सदस्य निवडले जाणार आहेत.