अकोला : विदर्भात तप्त उन्हाची चांगलीच झळ बसत आहे. अकोल्यात सलग दुसऱ्या दिवशी सर्वाधिक तापमान नोंदवल्या गेले. अकोल्यात सूर्य आग ओकत असून कमाल तापमान ४५.८ अं.से.वर पोहोचले. वाढत्या तापमानामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. अकोला जिल्ह्यात गेल्या आठवड्यात ढगाळ वातावरण होते. त्यानंतर १९ मेपासून पुन्हा उन्हाचा पारा चढण्यास सुरुवात झाली. सकाळी ९ वाजातपासूनच अकोलेकरांना उन्हाच्या झळा बसण्यास सुरुवात होते. दुपारनंतर रस्ते निर्मनुष्य होतात. तापमानाचे नवनवे उच्चांक गाठले जात आहेत. अकोल्यात २२ मे रोजी ४४.८ अं.से.वर तापमान पोहोचले. हवामान विभागाने तापमान आणखी वाढीसह उष्णतेच्या लाटेचा अंदाज व्यक्त केल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून तापमानाने ४५ चा टप्पा ओलांडला आहे. गुरुवारी अकोल्याचे तापमान ४५.५ अं.से.वर गेले. आज त्यात आणखी वाढ होऊन कमाल तापमान ४५.८ अं.से. नोंदवल्या गेले. किमान तापमान देखील ३० अं.से.च्या आसपास पोहोचले आहे.

हेही वाचा >>> शेकापचे नेते राहुल देशमुख यांना नागपुरात अटक; कार्यकर्ते रस्त्यावर…

शुक्रवारी अकोल्याचे किमान तापमान २९.३ अं.से. होते. अकोल्यासह विदर्भातील इतर शहरांमध्ये देखील कमाल व कमाल तापमान वाढले आहे. अमरावती कमाल ४४ व किमान २९.१, भंडारा ४२.३ व २९.५, बुलढाणा ४१.५ व २९.६, ब्रह्मपुरी ४५ व २८.६, चंद्रपूर ४३.४ व २६.४, गडचिरोली ४२.८ व २६.२, गोंदिया ४१.८ व २८.४, नागपूर ४२.६ व २७.४, वर्धा ४४.२ व २९.५, वाशिम ४४.२ व २२.६ आणि यवतमाळ येथे कमाल ४४.५ व किमान २८.५ अं.से. तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> डोंबिवलीत कारखाना सुरू ठेवण्यासाठी राज्य सरकारने लाच घेतली….नाना पटोले यांचा गंभीर आरोप……

अवकाळीनंतर उष्णतेची लाट

पूर्व व पश्चिम विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये गत आठवड्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे तापमानात काही प्रमाणात घसरण झाली होती. अवकाळी पाऊस माघारी फिरताच उष्णतेची लाट आली आहे. या आठवड्यात तापमानामध्ये झपाट्याने वाढ नोंदवल्या जात आहे. तापमान दररोज नवनवे उच्चांक गाठत असल्याचे दिसून येते. उकाड्यात प्रचंड वाढ झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. आता मोसमी पावसाच्या आगमनाकडे लक्ष लागले आहे.

पाण्यासाठी पायपीट अकोला जिल्ह्यात उन्हाच्या तीव्र झळांसोबतच भीषण पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहे. पाणीटंचाई निवारणार्थ प्रस्तावित उपाययोजनांची कामे अद्यापही कागदावरच आहेत. त्यामुळे भर उन्हाळ्यात ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र दिसून येते.