अकोला : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयातील कंत्राटी संगणक चालक पदावरील महिलेचा विनयभंग करणाऱ्या अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्याच्या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी कार्यालयात आज, सोमवारी ठिय्या आंदोलन केले. या प्रकरणात विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी लावण्याचा प्रयत्न केला असता विधानसभा अध्यक्षांनी त्याची दखल घेतली नाही. सभागृहात लक्षवेधी लागणार नसल्याचे तेच अधिकारी म्हणत असल्याने विधानसभा अध्यक्ष देखील ‘मॅनेज’ झाल्याचा गंभीर आरोप आमदार नितीन देशमुख यांनी केला. दरम्यान, या प्रकरणात शाखा अभियंत्यावर निलंबनाची कारवाई झाली, तर उपविभागीय अधिकाऱ्यावरील कारवाईचा प्रस्ताव मंत्रालयात पाठवला जाणार आहे.
मूर्तिजापूर येथील जीवन प्राधिकरण कार्यालयात कंत्राटी संगणक चालक पदावर एक महिला कार्यरत होती. दरम्यान, कार्यालयातील अधिकाऱ्यांनी संगणक चालक महिला कर्मचाऱ्याशी असभ्य वर्तन करून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. महिलेने गंभीर आरोप अधिकाऱ्यावर केले. या प्रकरणाची दखल शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी घेतली. या दोन्ही अधिकाऱ्यांना पदावरून बडतर्फ करण्यात यावे, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, यासाठी आमदार नितीन देशमुख यांनी सोमवारी दुपारी म.जी.प्रा.च्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. हा मुद्दा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात देखील उपस्थित करणार होते. त्यासाठी त्यांनी सभागृहात चर्चा होण्यासाठी लक्षवेधीचा प्रस्ताव दिला.
या लक्षवेधीसाठी विधानसभा अध्यक्षांकडे मागणी केली होती. आरोपी अधिकारीच लक्षवेधी लागणार नसल्याचे सांगत असल्याने विधानसभा अध्यक्षांवर देखील संशय असून ते ‘मॅनेज’ झाल्याचा आरोप नितीन देशमुख यांनी केला. अध्यक्षांनी लक्षवेधी जाणीवपूर्वक न घेतल्याने आपण आज अधिवेशनाला हजर न राहता एका बहिणीच्या न्यायासाठी ठिय्या आंदोलन करीत असल्याचे आमदार नितीन देशमुख यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हा प्रमुख गोपाल दातकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
निलंबनाचे काढले आदेश
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या मूर्तिजापूर उपविभागात कार्यरत शाखा अभियंता राजेंद्र अमृतराव इंगळे यांनी महिलेशी असभ्य वर्तवणूक केली. या प्रकरणात त्यांच्यावर मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा सुद्धा दाखल आहे. त्यामुळे मध्यवर्ती कार्यालयाकडून आलेल्या सूचनेनुसार शाखा अभियंता राजेंद्र इंगळे यांना १४ जुलैपासून निलंबित करण्यात येत असल्याचा आदेश महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे प्रभारी मुख्य अभियंता एस. एस. गव्हाणकर यांनी सोमवारी सायंकाळी काढला.