अमरावती : अक्षय कुमारने मोठ्या पडद्यावर अनेक प्रसिद्ध भारतीय पात्रे साकारली आहेत, ज्यात सम्राट पृथ्वीराज चौहानपासून ते पॅडमॅनमध्ये अरुणाचलम मुरुगनाथम यांचा समावेश आहे. ‘केसरी-२’ मध्ये अक्षय कुमारने एका कर्तबगार वकिलाची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट सध्या ‘ओटीटी’वर चांगलाच गाजत आहे. अक्षय कुमारने साकारलेले पात्र हे ब्रिटिश काळातील प्रसिद्ध वकील सर चेत्तूर शंकरन नायर यांचे आहे. त्यांचे महाराष्ट्रातील अमरावतीशी विशेष नाते आहे.
सर चेत्तूर शंकरन नायर यांचा जन्म मलबारच्या पल्लकड जिल्ह्यातील एका श्रीमंत कुटुंबात झाला. सीएस नायर हे एक सुप्रसिद्ध भारतीय वकील तसेच राष्ट्रवादी राजकारणी होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सुरुवातीच्या काळातले सर्वात तरुण अध्यक्ष बनले. १९१२ मध्ये, त्यांना ब्रिटिश राजघराण्याने नाइटची पदवी दिली. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या वेळी, सीएस नायर हे शिक्षण मंत्री आणि व्हाईसरॉयच्या कार्यकारी परिषदेतील एकमेव भारतीय प्रतिनिधी म्हणून काम करत होते. जालियनवाला हत्याकांडानंतर, रवींद्रनाथ टागोर यांनी निषेध म्हणून त्यांचा नाईटहूड पदवीचा त्याग केला होता. त्याचप्रमाणे, सीएस नायर यांनी ब्रिटिश सरकारच्या कृतींवर आपले मत व्यक्त केले आणि निषेध म्हणून आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.डिसेंबर १८९७ मध्ये अमरावतीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. सी. शंकरन नायर हे या अधिवेशनाचे अध्यक्ष होते, तर दादासाहेब खापर्डे हे स्वागताध्यक्ष होते.
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भरलेल्या या अधिवेशनात सी. शंकरन नायर यांचे प्रभावी अध्यक्षीय भाषण झाले. ब्रिटिश शासनकाळात देशातील दारिद्र्य बेसुमार वाढत असल्याची भावना सुशिक्षितात बळावत असल्याचे ते म्हणाले होते. पुण्यातील दडपशाहीचा उल्लेख करून तत्कालीन मुद्रण निर्बंध आणि नातूबंधूची अटक यामुळे सरकार नागरिकांच्या मुलभूत हक्कांची पायमल्ली करीत आहे, असे स्पष्ट मत त्यांनी मांडले होते. तसेच टिळकांवरील खटल्याच्या वेळी ज्युरीपैकी निम्मे सदस्य भारतीय असते, तर टिळक निर्दोष सुटले असते, असे विधान करण्यास त्यांनी मागेपुढे पाहिले नाही, असा उल्लेख ‘महाराष्ट्रातील काँग्रेसचा लढा’ या ग्रंथात आहे.
अमरावतीला झालेल्या काँग्रेस अधिवेशनापासून अमरावतीच्या महिलांनी राजकीय चळवळीत भाग घेण्याचा शुभारंभ झाला. यावेळी पुरूषांच्या विरोधाला न जुमानता वनिता समाजतर्फे स्त्रियांच्या कलाकुसरीचे व स्वदेशी वस्तूंचे एक प्रदर्शन अधिवेशनाच्या मंडपाला लागूनच भरले होते. याच अधिवेशानतून जहाल विचारसरणीला अधिक धार आली, असे मानले जाते.