नागपूर : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्या कट्टर समर्थक आणि बहुजन-रिपब्लिकन एकता मंचच्या प्रमुख सुलेखा कुंभारे यांची मागील १५ वर्षापासूनची मैत्री आहे. या मैत्रीखातरच कुंभारे यांचा पक्ष सर्वच निवडणुकांमध्ये भाजपला पाठिंबा देत आला आहे. मात्र कुंभारेंची कर्मभूमी कामठीत त्यांना भाजपने दुखावले असून येथे होणाऱ्या नगर पालिका निवडणुकीत भाजप विरुद्ध सुलेखा कुंभारे यांचा पक्ष अशी लढत होत आहे.

भाजपने येथे नगराध्यक्षपदाची उमेदवारी अग्रवाल यांना दिली आहे तर कुंभारे यांच्या पक्षातर्फे अजय कदम यांनी अर्ज दाखल केला आहे. भाजपने युतीचा प्रस्ताव फेटाळला,असा आरोप कदम यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना केला. कामठी हा पालकमंत्री चंद्रशेखऱ् बावनकुळे यांचा मतदारसंघ आहे. हे येथे उल्लेखनीय.

नगर पालिका निवडणुकीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत कामठीत भाजप-बरिएमची युती होईल, अशीच चर्चा होती. बरिएमच्या प्रमुख सुलेखा कुंभारे यांनी सुद्धा हाच दावा केला होता. मात्र भाजपकडून अग्रवाल यांचे नाव अध्यक्षपदासाठी जाहीर झाले, त्यांचा अर्ज भरण्यासाठी खुद्द बावनकुळे आले, त्याच वेळी भाजप-बरिएमची युती तुटल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर बरिएमकडून या पक्षाचे माजी नगरसेवक अजय कदम यांनी अर्ज दाखल केला.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बरिएमकडून भाजपला युतीचा प्रस्ताव देण्यात आला होता. नगरसेवकांच्या काही जागांच्या संदर्भात तो प्रस्ताव होता.मात्र पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत पुढे काहीच चर्चा केली नाही. बरिएमने तर भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली, तरी सुद्धा बावनकुळे यांनी यावर सकारात्मक किंवा नकारात्मक असा कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे शेवटपर्यंत बरिएमचे नेते भाजपच्या उत्तराची वाट बघत राहिले. आणि अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी थेट नगराध्यक्षपदाचाच अर्ज दाखल केल्याने बरिएमची कोंडी झाली, त्यामुळे त्यांनी त्यांचा नगराध्यक्ष आणि नगरसेवकाच्या सर्व जागांसाठी उमेदवार दिले. त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठी नगर पालिकेत भाजपचा मित्रपक्ष असलेला बरिएम यांच्यात लढत होईल. बरिएमच्या अध्यक्ष सुलेखा कुंभारे या प्रथमच या निमित्ताने भाजपच्या विरोधात प्रचार करताना दिसणार आहे.