नागपूर : मराठी माणूस आता जगभरात पसरला आहे. जिथे तो गेला आहे त्याने आपली संस्कृती तिथे नेली आहे, ती पुरेपूर रुजवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातले सणसमारंभ आता महाराष्ट्रापुरता किंवा भारतापुरता न राहता त्याला जागतिक स्वरुप मिळाले आहे. नुकताच पार पडलेला गणेशोत्सव आता विविध देशात साजरा झाला. काही देशात तो नेहमीप्रमाणे दणक्यात साजरा झाला. मात्र नेदरलँड्समध्ये हा गणेशोत्सव पहिल्यांदाच साजरा झाला. या यशस्वी आयोजनामागे मूळ नागपूरकर असलेल्या अमित काशीकर यांचा सिंहाचा वाटा होता. अमित काशीकर यांचे शिक्षण नागपुरात झाले असून काही काळ भारतात राहिल्यानंतर कामानिमित्त त्यांचे विविध देशात वास्तव्य होते.

गेल्या १२ वर्षांपासून ते नेदरलँड्सला आहेत. तिथे फक्त मराठीच नाही तर तमाम भारतीयांना एकत्र आणून त्यांनी ‘विज द पिपल’ नावाची संस्था यावर्षी गुढीपाडव्याला स्थापन केली. नेदरलँड्समध्ये राहत असलेल्या भारतीयांना एकत्रित आणण्यापासून ते अडचणी सोडवण्यापर्यंत अनेक कामात ही संस्था सक्रिय सहभाग घेते. या संस्थेतर्फे ३० ऑगस्टला गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

असा रंगला गणेशोत्सव सोहळा?

या कार्यक्रमाला ३०० पेक्षा अधिक लोक उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी थेट जर्मनीहून ढोल पथक बोलवण्यात आले होते. उपस्थितांनी एकसुरात आरती म्हणत वातावरणात भक्तिरसाची निर्मिती केली. त्याचप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रमही पार पडले. यावेळी संस्थेतर्फे एआय सोबत निगडीत उपक्रमाचे अनावरण करण्यात आले. तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य या विषयावर वादविवाद स्पर्धाही घेण्यात आली.

विजय मुळचे कोलकात्याचे आहेत. त्यांनी काही काळ मुंबईत काम केले आहे. त्यामुळे गणोशोत्सवाशी त्यांची नाळ जुळली आहे. नेदरलँड्समध्ये त्यांचे हे पहिलेच वर्षं होते. या कार्यक्रमामुळे त्यांनी गणेशोत्सव मिस केला नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे नेटके आयोजन आणि संस्थेचे संस्थापक आणि आयोजक अमित काशीकर यांच्या भूमिकेने ते भारावून गेल्याचे म्हणाले. कार्यक्रमात फक्त मराठीच नाही तर भारतातून स्थायिक झालेले अनेक लोक उपस्थित होते. अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी या संस्थेचे आभार मानले.

अमित काशीकर यांनी काय सांगितले?

अमित काशीकर यांनीही याप्रसंगी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडल्यामुळे आनंद आणि समाधान वाटत आहे. आम्ही या संस्थेतर्फे जेव्हा हा कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतला तेव्हा आम्ही ठरवलंच होते की फक्त परंपरा पुढे नेण्यासाठी हा कार्यक्रम नाही. तर गणेशोत्सवाच्या निमित्ताने आम्हाला विविध संस्कृतीचा मिलाफ घडवायचा होता. जिथे लोक सर्व भेदाभेद विसरून एकत्र येतील. या कार्यक्रमाच्या आयोजनानिमित्त आणि मूळ कार्यक्रमात सुद्धा ‘वसुधैव कुटुंबकम’ या उक्तीचा पूरेपूर प्रत्यय आला. संस्थेचा संस्थापक म्हणून मला असे वाटते की माझ्यासाठी हा फक्त यशस्वी कार्यक्रम नव्हता. हा प्रवास आम्ही का सुरू केला याची ती आठवण होती. कार्यक्रमात अनेक अनोळखी लोक भेटले आणि मैत्रीच्या वाटेवरचे प्रवासी झाल्याचे मला दिसले. लहान मुले मोठ्या माणसांकडून अनेक गोष्टी शिकत होती. विविध भाषांमध्ये प्रार्थना म्हटल्या गेल्या, आणि समसमान भक्तीभावाने सर्वधर्मीयांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. अशा कार्यक्रमात आपला जात, धर्म, पंथ, गळून पडतो आणि आपण एक असतो असे वाटते. टिळकांनी जेव्हा गणेशोत्सव सुरू केला तेव्हा त्यांची काय भावना असेल याची थोडीफार झलक मला यानिमित्ताने पहयाल मिळाली. मी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्वांचे आभार मानतो, असे अमित काशीकर म्हणाले.