गडचिरोली : गृहमंत्री अमित शहा यांच्या ३१ मार्च २०२६ पर्यंत देशातून नक्षलवाद हद्दपार करण्याच्या घोषणेनंतर नक्षलविरोधी मोहीम अधिक गतिमान करण्यात आली. त्यामुळे घाबरलेल्या नक्षलवाद्यांनी ३ महिन्यांपूर्वी पत्रक प्रसिद्ध करून शांतीवार्ता आणि युद्धविरामची मागणी केली होती. मात्र, केंद्र सरकारकडून उत्तर न मिळाल्याने नक्षलवाद्यांचा प्रवक्ता भूपती उर्फ सोनू उर्फ अभयने पुन्हा एकदा चर्चेही मागणी केली आहे.

१५ ऑगस्ट रोजी नक्षलवाद्यांकडून पुन्हा एकदा एक पत्र जारी करून संघर्षविरामाची मागणी करण्यात आली होती. या पत्रात एक महिन्यासाठी सशस्त्र संघर्ष थांबवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. तसेच सरकारसोबत शांततेसाठी संवाद साधण्याची तयारी दर्शविण्यात आली होती. ‘कॉम्रेड अभय’ या नावाने हे पत्र जारी झाले होते. या कालावधीत नक्षली कार्यकर्त्यांशी विचारविनिमय करण्याची मागणी पत्राद्वारे करण्यात आली होती. ‘‘आम्ही शांततेच्या दिशेने पाऊल उचलत आहोत, त्यामुळे सरकारनेही हिंसाचार रोखण्यासाठी प्रयत्न करावेत,’’ असे पत्रात नमूद करण्यात आले होते. तथापि, एक महिन्याचा कालावधी संपल्यानंतरही केंद्र सरकारकडून या प्रस्तावावर कोणताही प्रतिसाद देण्यात आलेला नाही.

गृह मंत्री अमित शाह यांनी संसदेत अनेकदा ३१ मार्च २०२६ पर्यंत देश नक्षलमुक्त करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. जानेवारी २०२४ पासून सुरक्षा दलांनी नक्षलविरोधी मोहिमेला गती दिली असून आतापर्यंत अनेक टॉप कमांडर सुरक्षा दलांच्या कारवाईत मारले गेले आहेत.

गेल्या ६० वर्षांत नक्षलवादी हिंसाचारामुळे तब्बल ४,००० हून अधिक नागरिक आणि २,८०० पेक्षा जास्त सुरक्षा जवान मृत्युमुखी पडले आहेत. छत्तीसगड, महाराष्ट्रातील गडचिरोली, झारखंड, बिहार आणि ओडिशा या राज्यांमध्ये आजही हिंसा सुरूच असून अलीकडील हल्ल्यांमध्ये आदिवासी व सरकारी कर्मचारीही बळी पडले आहेत. त्यामुळे नक्षलवाद्यांनी शस्त्र खाली टाकून आत्मसर्पण करावे. त्यानंतरच चर्चा केली जाईल, असे सरकारकडून आधीच स्पष्ट करण्यात आले आहे.

देशभरातील सदस्यांना अभिप्राय पाठविण्याचे आवाहन

शांतीवार्ता प्रस्तावाबाबत संघटनेतील अनेक मोठे नेते अनुकूल आहे. संपर्कात नसलेले पण संघटनेत कार्यरत, तुरुंगात असलेल्या महत्त्वाच्या नेत्यांचे देखील यासंदर्भात मत जाणून घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्यांनी देखील अभिप्राय पाठवावे असे आवाहन पत्रकातून करण्यात आले आहे.यासाठी पहिल्यांदाच नक्षल संघटनेने ईमेल आणि फेसबुकचा पत्ता दिला आहे.