अमरावती : प्रेमसंबंधातून पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने लाकडी फळीने हल्ला चढवून पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना पथ्रोट येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी मृतकाच्या मोठ्या भावाच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
अरविंद नजीर सुरत्ने (४८) रा. गरजदरी, ह. मु. पथ्रोट असे मृताचे नाव आहे. हत्येप्रकरणी अमित लवकुश मिश्रा (३३) रा. पथ्रोट व २७ वर्षीय महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. अरविंद सुरत्ने यांचा प्रेमविवाह झाला होता. व्यवसायाने चालक असलेले अरविंद हे पत्नी व दोन मुलांसह पथ्रोट येथे भाड्याने राहत होते. दरम्यान, २ सप्टेंबर रोजी रात्री ११.४५ वाजताच्या सुमारास मृतक अरविंद यांचे मोठे भाऊ अशोक सुरत्ने हे परतवाडा येथील घरी हजर असताना त्यांचा भाचा अनिल याने त्यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधला. अरविंद मामाचा खून करण्यात आल्याचे त्याने त्यांना सांगितले.
अमित मिश्रा याच्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधामुळे अरविंद मामा व मामीत कडाक्याचा वाद झाला. त्या वादात अमित व मामीने मामा अरविंद यांना मारून टाकल्याचे त्याने सांगितले. दरम्यान, याबाबत माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष ठाकरे व पथ्रोटचे ठाणेदार सचिन पुंडगे यांनी घटनास्थळ गाठले. त्यावेळी अरविंद यांचा चेहरा रक्ताने माखलेला दिसून आला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला. महिला आरोपी व अमित मिश्रा या दोघांनी अरविंद यांचा खून केल्याचे चौकशीदरम्यान निष्पन्न झाले. विशेष म्हणजे, दोन्ही आरोपी परस्परांना वाचविण्याचा खटाटोप करीत असल्याचे निरीक्षण पोलिसांनी नोंदविले. या प्रकरणी मृतक अरविंद यांचे मोठे भाऊ अशोक यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी अमित व महिलेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.
हत्येपुर्वी कडाक्याचे भांडण
अरविंद यांना ७ व ५ वर्षे वयाची दोन मुले आहेत. अरविंद याला पत्नीच्या प्रेमसंबंधांची कुणकुण लागली होती. दोन दिवसांपुर्वी अरविंद यांच्या घरचे गॅस सिलिंडर गेले. ते आरोपी अमितने भरून आणले. ती बाब अरविंद यांना समजताच त्यांनी पत्नीला जाब विचारला. आरोपीने आणून दिलेल्या सिलिंडरमुळे त्यांच्यातील वाद अधिक वाढला. अरविंद व त्यांच्या पत्नीत कडाक्याचे भांडण झाले. ती बाब तिने आरोपीला सांगितली. आरोपी अरविंदच्या घरी पोहोचला. तथा दोघांनी मिळून अरविंदचा खून केला. अरविंद यांची पत्नी आरोपीकडे स्वयंपाकाचे काम करायची. आरोपी अविवाहित आहे.