अमरावती : चार दिवसांपूर्वी दर्यापूर येथे घडलेल्या हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. वडिलांना शिवीगाळ केल्याच्या क्षुल्लक कारणावरून १९ वर्षीय ओम अभयराव देशमुख या तरुणाने ५४ वर्षीय राजेश इंगळे यांची लाकडी दांड्याने वार करून हत्या केल्याचे तपासात उघड झाले आहे. ही घटना २२ सप्टेंबर २०२५ च्या रात्री दर्यापूर येथील धंनजय लॉजच्या मागील रस्त्यावर घडली होती. दर्यापूर पोलिसांनी याप्रकरणी आरोपी ओम देशमुख याला अटक केली आहे.
तहसील कार्यालयात नक्कल विभागात कार्यरत असलेले राजेश इंगळे (वय ५४, रा. सैनिक कॉलनी, दर्यापूर) यांचा २२ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री खून करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी घटनास्थळी भेट दिली आणि तात्काळ आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेची चार पथके आणि दर्यापूर पोलिसांची दोन पथके यांनी मिळून सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारावर कसून तपास सुरू केला.
सतत तीन दिवसांच्या तपासानंतर पोलिसांना खात्रीलायक माहिती मिळाली की, ही हत्या तहसील कार्यालयाजवळच राहणाऱ्या ओम देशमुख याने केली आहे. पोलिसांनी संशयित आरोपी ओम देशमुख याला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने गुन्ह्याची कबुली दिली नाही, परंतु सखोल चौकशीनंतर त्याने गुन्हा केल्याचे मान्य केले. ओम देशमुख याने पोलिसांना सांगितले की, त्याची आणि राजेश इंगळे यांची ५-६ वर्षांपासून ओळख होती. घटनेच्या रात्री किरकोळ कामासाठी दोघांची भेट झाली होती. यावेळी बोलता बोलता राजेश इंगळे यांनी सहजपणे ओमच्या वडिलांना शिवीगाळ केली. त्याचा तीव्र राग ओमच्या मनात निर्माण झाला. याच रागाच्या भरात ओमने जवळ असलेल्या लाकडी दांड्याने राजेश इंगळे यांच्या डोक्यावर जोरदार वार केले आणि त्यांचा जागीच खून केला.
पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक किरण वानखडे, दर्यापूरचे ठाणेदार सुनील वानखडे यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक सचिन पवार, पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार, नितीन इंगोले, मुलचंद भांबुरकर, अभय चौथनकर, विशाल दादळे आणि इतर पोलीस अंमलदारांच्या पथकाने हा गुन्हा यशस्वीरित्या उघडकीस आणला.