अमरावती : अमरावती विभागात महामार्ग, राज्यमार्ग आणि ग्रामीण रस्त्यांवर नियमबाह्य पद्धतीने प्रवासी वाहतूक करणाऱ्या स्टेज कॅरेज बसेस तसेच अवैध प्रवासी वाहनांवर प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या दोषी वाहनांवर दंडात्मक शुल्क आकारून वाहतुकीला शिस्त लावण्याची मोहीम सुरू आहे.

अमरावती ते मोर्शी, वरुड ते पांढुर्णा, मुलताई रस्त्यावरील तसेच परतवाडा ते अंजनगाव, आकोट मार्गे अकोला आणि परतवाडा ते धारणी या प्रमुख मार्गांवर धावणाऱ्या बसेसची तपासणी करण्यात आली. यामध्ये विनापरवाना वाहतूक, कॉन्ट्रॅक्ट कॅरेज परवान्याच्या शर्तींचा भंग करणाऱ्या, जादा भाडे आकारणाऱ्या तसेच वेळापत्रकाचे पालन न करणाऱ्या बसेसवर कारवाई करण्यात आली आहे.

दोन टप्प्यांत साडेचार लाखांहून अधिक दंड

आरटीओ विभागाने १६ डिसेंबर २०२४ पासून सप्टेंबर २०२५ पर्यंत विशेष तपासणी मोहीम राबवली. १६ डिसेंबर २०२४ ते ३० जून २०२५ या कालावधीत ४२९ वाहने तपासली गेली असून त्यापैकी १४३ दोषी ठरली. या कालावधीत एकूण ७ लाख ७० हजार ७५० रुपये इतके तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. तर १ जुलै २०२५ ते ३० सप्टेंबर २०२५ या तीन महिन्यांत ३९६ वाहने तपासून १३२ दोषी वाहनांवर ७ लाख २७ हजार २५० रुपये इतके दंडात्मक शुल्क आकारण्यात आले आहे. अंदाजे नऊ महिन्यांच्या कालावधीत एकूण ८२५ वाहनांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी २७५ वाहने दोषी आढळली आहेत. या कारवाईतून १४ लाख ९८ हजार रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले आहे.

कठोर कारवाईचा इशारा

अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी ही मोहीम यापुढेही सुरूच राहणार असून, दोषी बस मालक व चालकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी दिला आहे.

तसेच, सणासुदीच्या काळात रस्ते वाहतूक सुरक्षा आणि ज्यादा भाडेवाढ या अनुषंगाने तपासणी मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. सण कालावधीत मुंबई, पुणे यासारख्या महानगरांमधून अमरावतीत येणाऱ्या विद्यार्थी, नोकरदार लोकांची संख्या मोठी असते. अशावेळी प्रवाशांची निकड लक्षात घेऊन प्रचंड भाडेवाढ केली जात असते. दिवाळी सणाच्या वेळी तर हा अनुभव दरवर्षी येतो. आरटीओच्या या कारवाईमुळे प्रवाशांची लूट करणाऱ्यांवर जरब बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.