लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यंटकांवर हल्ला केला आहे. यामध्ये २८ जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यानंतर पहलगाम खोऱ्यात दहशतीचे वातावरण आहे. आता लोक तिथे जायलाही भीत आहेत. देशातील पर्यटक तिकडे आहेत. त्यात नागपूर आणि विदर्भातील पर्यटक देखील आहेत.

काटोल मतदार संघातील मूर्ती येथील देशभ्रतार व कोराडी येथील वाघमारे कुटुंबीय हे श्रीनगर येथे फिरण्यासाठी गेले होते. पहलगाम येथे सोमवारी झालेल्या हल्ल्याच्या वेळी हे दोन्ही कुटुंब घटना स्थळाच्या काहीच अंतरावर होते. सध्या ते श्रीनगर येथील एका हॉटेलमध्ये सुरक्षित असून त्यांच्यासोबत अनिल देशमुख यांनी संवाद साधत धीर दिला. तसेच राज्य शासनाला या कुटुंबीयांची माहिती देवून त्यांना सुखरुप आणण्याची विनंती केली.

मूर्ती येथील प्रफुल्ल देशभ्रतार त्यांच्या पत्नी मेघा तसेच कोराडी येथील पृथ्वीराज वाघमारे त्यांच्या पत्नी मनिषा आणि मुली श्रेयषा व एकता हे श्रीनगर येथे फिरण्यासाठी गेले होते. सोमवारी पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला तेव्हा ते घटनास्थळाच्या काहीच अंतरावर होते. ज्या गाडीतून हे दहशवादी आले होते त्या गाडीचा प्रफुल्ल यांना संशय आला होता आणि त्याने स्थानिक घोडेवाल्याकडे याची विचारणा केल्याची माहिती त्यांनी अनिल देशमुख यांना सांगितली. घटनेनंतर स्थानीक नागरीकांच्या मदतीने आम्ही श्रीनगर येथे हॉटेलला सुखरुप आलो असल्याचेही त्यांनी अनिल देशमुख यांना सांगितले. अनिल देशमुख यांनी दोन्ही कुटुंबियांना हिम्मत दिली. देशभ्रतार आणि वाघमारे कुटुंबियांना लवकरात लवकर नागपूरला आणण्यासाठी प्रशासनाला त्यांची संपूर्ण माहिती देत विनंती केली.

पहलगाम पर्यटकांचे आकर्षण का?

पहलगाममध्ये जिथे हा हल्ला झाला त्या भागाला मिनी स्वित्झर्लंड असेही म्हटले जाते. जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्हा आणि त्याचा पहलगाम परिसर अनेकदा दहशतवाद्यांच्या लक्ष्यावर असतो. परंतु, यापूर्वी बैसरन खोऱ्यात कधीही दहशतवादी हल्ला झाला नव्हता. या भागात स्थानिक लोकांनंतर पर्यटक सर्वात सुरक्षित मानले जात होते. यामुळे येथे लष्कर किंवा पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले नव्हते. या परिस्थितीचा फायदा घेत दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळ्या झाडल्या.

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर गुप्तचर यंत्रणा सातत्याने तपास करत आहेत. या हल्ल्याचा कट पाकिस्तानातील रावळकोटमध्ये रचण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी दहशतवाद्यांनी पहलगामला जाण्यासाठी पीर पंजाल टेकड्यांचा पर्याय निवडला. वास्तविक, दहशतवादी पीर पंजाल डोंगरातून भारतात घुसले. यानंतर तो राजौरीहून चत्रू आणि नंतर वाधवन मार्गे पहलगामला पोहोचला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anil deshmukh interacts with tourists stranded in srinagar from nagpur rbt 74 mrj