वर्धा : नव्या नियुक्त्यांमध्ये भाजपाने विदर्भात तेली समाजाचा एकही जिल्हाध्यक्ष न केल्याबद्दल तेली समाजात अस्वस्थता पसरली आहे. एक महिन्यापूर्वी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील पक्षाचे नवे जिल्हाध्यक्ष जाहीर केले. उत्तर महाराष्ट्रात नेमलेल्या तेली समाजाच्या एका जिल्हाध्यक्षाशिवाय उर्वरीत महाराष्ट्रात या समाजास अध्यक्षपद मिळाले नसल्याचे निदर्शनास आणल्या जाते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०१४ पासून या समाजाने काँग्रेसकडे पाठ फिरवीत भाजपाला जवळ केले. तसेच निवडणुकीतसुद्धा भरभरून मते दिल्याचे संघटना नेते दावा करतात. हा समाज प्रामुख्याने विदर्भात एकवटला आहे. विदर्भात भाजपाला यश मिळण्यामागे या समाजाचा बहुमोल वाटा असल्याची राजकीय चर्चासुद्धा होते. या पार्श्वभूमीवर राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या तेली समाजातील भाजपा नेत्यांना विदर्भात किमान दोन जिल्ह्यांत अध्यक्षपद अपेक्षित होते. वर्धा येथून माजी नगराध्यक्ष अतुल तराळे तसेच राजेश बकाने, गडचिरोलीतून प्रमोद पिपरे, अमरावतीतून माजी आमदार जगदीश गुप्ता, नागपुरातून आमदार कृष्णा खोपडे तर भंडारा येथून श्रीराम गिरीपूंजे यांचा भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदासाठी दावा होता. मात्र एकासह संधी मिळाली नाही.

हेही वाचा – सना खान हत्याकांडाबाबत भाजपचे मौन? फेसबुकवरील छायाचित्रांतून दांडगा जनसंपर्क समोर

विदर्भापेक्षा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे अमळनेर येथून शिरीष चौधरी, तर नंदूरबारमधून विजय चौधरी यांना ताकद देत असल्याचे म्हटल्या जाते. त्यांनी स्वत:च्या मुलाला पद दिले. मात्र इतर नेत्यांच्या मुलाला युवा संघटनेत डावलल्याचे निदर्शनास आणल्या जाते. ही बाब वरिष्ठ नेत्यांकडे दिल्लीत पण मांडल्या गेली. त्यावेळी प्रदेशाध्यक्षपद माझ्याकडे म्हणजेच विदर्भात असल्याने परत समाजातीलच इतर नेत्यांना संधी देण्याचे कारण नसल्याचा युक्तीवाद त्यांनी केल्याचे या घडामोडीशी संबंधित एका नेत्याने लोकसत्तास सांगितले.

भाजपात बावनकुळे म्हणजेच सर्व तेली समाज काय, असा संतप्त सवाल या नेत्याने केला. पक्षातील समाजाच्या इतर नेत्यांनी पक्षाकडून अपेक्षा ठेवायची नाही तर कुणाकडून ठेवायची, असे प्रश्न समाज संघटनेच्या दोन नेत्यांनी उपस्थित केले. तसेच आहे त्या नेत्यांचे खच्चीकरण तर केल्या जात नाही ना असा सवाल केल्या जातो. या संदर्भात प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या दोन्ही भ्रमणध्वणी क्रमांकावर संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रतिसाद मिळाला नाही.

हेही वाचा – वाघाची शिकार प्रकरण : बावरीया टोळीच्या तीनजणांना अटक, तीन दिवसांची वन कोठडी

आमदार रामदास आंबटकर म्हणतात की समाजाचा विदर्भात एकही अध्यक्ष नाही हे जरी खरे असले तरी प्रदेशाध्यक्ष विदर्भातील आहे ना. शेवटी सगळे कार्यकर्ते आहे. पदाचा मोह कुणाला नाही.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: As bjp has not appointed any district president in vidarbha there is unrest in the teli society pmd 64 ssb