अकोला : देशातील १७ कोटी मुस्लिमांना योग्य प्रतिनिधित्व मिळालेले नाही. केवळ मत देणारे न राहता मत घेणारे नेतृत्व समाजातून निर्माण झाले पाहिजे. महाराष्ट्रातून चार मुस्लीम खासदार लोकसभेत पाठवण्याचा निर्धार करा, असे आवाहन ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल मुस्लिमीनचे (एआयएमआयएम) राष्ट्रीय अध्यक्ष खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांनी येथे केले. ‘एआयएमआयएम’च्यावतीने शहरातील गडंकी मार्गावरील शाह जुलफिकार मैदान येथे रविवारी रात्री आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या सभेला ‘एआयएमआयएम’चे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलिल, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष डॉ. गफ्फार कादरी, विदर्भ प्रदेश अध्यक्ष शाहिद रंगूनवाले, शेख मुस्तफा, जिल्हाध्यक्ष सैयद मोहसीन अली आदी उपस्थित होते.

हेही वाचा – “पोलीस आमच्या राज्यात आमचे काय बिघडवणार?” नितेश राणेंचे वादग्रस्त विधान, म्हणाले…

ओवेसी म्हणाले, भारतातील मुस्लिमांनी आता आपल्या मताचा योग्य वापर करण्याची खरी गरज आहे. भाजपला रोखण्याची जबाबदारी केवळ १७ कोटी मुस्लिमांची नाही. ती प्रत्येक समुहातील जबाबदार नागरिकांची आहे. मुस्लीम राजकारणाचे बळी ठरत आहेत. मुस्लिमांची १४ टक्के लोकसंख्या असताना लोकसभेत पाच टक्केसुद्धा खासदार नाहीत. भारतीय राजकारणात मुस्लिमांना कुठलेही स्थान नाही, असा आरोप त्यांनी केला.

हेही वाचा – ‘कौशल्य विकास’ मधून ३० टक्के रोजगार, ८ वर्षांतील आकडेवारी; देशात ९ वर्षांत १२.३५ लाख तरुणांना  प्रशिक्षण

महाराष्ट्रातील विधानसभेमध्ये ५०-६० मुस्लीम आमदार पाहिजे. मात्र, ते का होत नाहीत, याचा विचार करा. राजकारणात केवळ मुस्लिमांच्या मतांचा वापर केला जातो. मुस्लिमांच्या डोक्यात सर्वधर्मसमभावचे विचार पेरण्यात आले आहेत. राजकारणात ते मानू नका, असे आवाहन त्यांनी केले. भाजपची ‘बी टीम’ असल्याचा आरोप आमच्यावर करण्यात येत होता; मात्र आरोप करणारेच आज भाजपसोबत चहा पित आहेत, अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले असून, अजित पवार आज कुठे आहेत? अशी विचारणा करीत आता सांगा कोण आहे भाजपची ‘बी टीम’ असा प्रश्नही ओवेसी यांनी उपस्थित केला. आगामी निवडणुका पक्ष पूर्ण तयारीनी लढवणार असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी आपल्या भाषणात सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asaduddin owaisi akola statement send four muslim mp from maharashtra to lok sabha asaduddin owaisi appeal ppd 88 ssb