नागपूर : तरुणांच्या हाताला काम देण्याच्या अनुषंगाने अत्यंत गाजावाजा करून केंद्र सरकारने सुरू केलेल्या पंतप्रधान कौशल्य विकास योजनेतून महाराष्ट्रात आठ वर्षांत फक्त ३० टक्के युवकांनाच रोजगार संधी मिळू शकली आहे. युवकांच्या हाताला काम मिळावे म्हणून केंद्र सरकारने २०१५ पासून पंतप्रधान कौशल्य विकास योजना सुरू केली. तरुणांना रोजगारक्षम प्रशिक्षण देऊन उद्योग क्षेत्रात कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देणे व रोजगार संधी निर्माण करणे हा यामागचा उद्देश आहे.

राज्यात एकूण ६४ रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले. त्यातून उमेदवारांची निवड केल्यावर मनुष्यबळाची गरज असलेल्या उद्योगांशी त्यांची सांगड घातली जाते व त्यांच्या गरजेनुसार मुलांच्या नावांची शिफारस केली जाते. स्किल इंडिया डिजिटल पोर्टलच्या माध्यमातून उमेदवारांना नोकऱ्या व प्रशिक्षणार्थी सेवेची संधी मिळू शकते. केंद्र सरकारकडून यासाठी निधीही दिला जातो. देशभरात ९ वर्षांत १२.३५ लाख तरुणांना विविध प्रकारचे कौशल्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. महाराष्ट्रात अलीकडेच नमो रोजगार मेळावे घेण्यात आले. नागपूरमध्येही हा मेळावा झाला होता.

हेही वाचा >>>“नेते, उद्योगपतींनंतर आता ईडी व्यापाऱ्यांना छळणार, सावध व्हा”, ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा इशारा; म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रोजगाराचा शोध सुरूच

केंद्रीय कौशल्य विकास मंत्रालयाने या योजनेच्या महाराष्ट्रातील अंमलबजावणीचा तपशील काही दिवसांपूर्वी संसदेत सादर केला होता. त्यानुसार महाराष्ट्रात २०१५ ते पासून ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत एकूण २ लाख ७० हजार ३४७ तरुणांना उद्योग क्षेत्राला लागणारे अल्पकालीन प्रशिक्षण (शॉर्टटर्म ट्रेनिंग) देण्यात आले होते. त्यापैकी आतापर्यंत ८० हजार, ९५० (३० टक्के) जणांना विविध उद्योग आस्थापनांत रोजगार संधी मिळाली आहे. उर्वरितांचा मात्र रोजगाराचा शोध सुरू आहे.