नागपूर : गाजलेल्या ‘गार्गी’ या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक आशीष उबाळे (६०) यांनी आर्थिक विवंचनेतून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास नागपुरातील रामकृष्ण मठात घडली.

धंतोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशीष हे मूळचे नागपूरकर होते. ते प्रतापनगरात वडिलोपार्जित घरात राहत होते. २५ वर्षांपूर्वी त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात काम सुरू केले. त्यासाठी त्यांनी मुंबई गाठली. अनेक मालिका आणि चित्रपटांचे दिग्दर्शन केले. तसेच काही चित्रपटात स्वत: भूमिकासुद्धा साकारली. त्यांनी काही वर्षांपूर्वी प्रतापनगरातील घर विकले व आईवडिलांसह ते मुंबईत राहायला गेले. स्वबळावर काही मालिकांचे दिग्दर्शन केले. त्यासाठी कर्ज घेतले. परंतु, अपेक्षित यश मिळाले नाही व कर्जाची रक्कम वाढत गेली. त्यामुळे ते चिंतेत होते. दोन दिवसांपूर्वी ते मुंबईवरुन नागपुरात आले. धंतोलीतील रामकृष्ण मठात त्यांचा लहान भाऊ सारंग उबाळे हा सेवेकरी आहे. भावाला भेटण्यासाठी ते रामकृष्ण मठात गेले व भावाच्या विनंतीवरुन तेथील एका खोलीत मुक्कामी थांबले. शनिवारी दुपारी दीड वाजता जेवन केले. सायंकाळी चहा घेण्यासाठी ते बाहेर न आल्याने सारंग त्यांच्या खोलीत गेला असता ते गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले.

‘गार्गी’मुळे देशभर ओळख

एक तरुणी आणि तिचा भाडोत्री नृत्यसहकारी यांची कथा असलेला ‘गार्गी’ नावाचा त्यांचा चित्रपट चांगलाच गाजला होता. गार्गी चित्रपट २००९ साली नागपूर येथे भरलेल्या ‘कार्लस्बर्ग आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ मध्ये दाखवला गेला होता. या चित्रपटाचे संवाद लेखन श्याम पेठकर यांचे होते. आशीष उबाळे यांची निर्मिती असलेल्या मालिकांमध्ये अग्नी, एका श्वासावे अंतर, गजरा, चक्रव्यूह आणि गार्गी चित्रपट त्यांनी तयार केला होता. प्रेमासाठी वाट्टेल ते आणि बाबुरावला पकडा या चित्रपटाचे दिग्दर्शनही उबाळे यांनी केले होते.

जगजित सिंग यांच्यासोबत काम

प्रख्यात गजल गायक जगजित सिंग यांचे अखेरचे ‘रेकॉर्डिंग’ उबाळे यांच्या ‘आनंदाचे डोही’ या मराठी सिनेमासाठी झाले. सिनेमात दिलीप प्रभावळकर यांच्यावर गझल चित्रित करण्यात आली. त्यांचे आणि जगजीत सिंग यांचे निकटचे संबंध होते.