Diwali 2025 Discount नागपूर: महागाईच्या काळातही दिवाळीनिमित्त नागपूरसह सर्वच शहरांतील बाजारात ग्राहकांची तुफान गर्दी वाढली आहे. जास्तित जास्त ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी अनेक माॅल्स, व्यवसायिक प्रतिष्ठानांसह किरकोळ ग्राहकांकडूनही विविध आकर्षक सवलती जाहिर केल्या गेल्या आहे. तर बाजारात नवनवीन पद्धतीचे आकाशकंदील, लाईट्सच्या माळा, विविध दिवे बघायला मिळत आहे. त्यामुळे व्यवसायिकांच्या चेहऱ्यावर आनंद बघायला मिळत आहे.
नागपुरातील विविध इलेक्ट्रिक दुकानांनी ‘फेस्टिव्हल सेलिब्रेशन ऑफर्स’, ‘खरेदी करा आणि बंपर गिफ्ट मिळवा’ अशा आकर्षक योजना जाहीर केल्या आहेत. स्मार्ट एलईडी सिरीज, रिमोट कंट्रोल दिवे, सोलर पॉवर लॅम्प्स, वॉटरप्रूफ स्ट्रिंग लाइट्स आणि रंग बदलणारे डेकोरेटिव्ह बल्ब्स ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहेत. अनेक कुटुंबं संध्याकाळी बाजारपेठेत फिरत, दिवाळीच्या रोषणाईसाठी योग्य वस्तू निवडत आहेत. ‘यंदाची दिवाळी स्मार्ट आणि सोलर’ अशीच बाजारपेठेची थीम दिसत आहे. दरम्यान नागपुरातील महाल, सीताबर्डी, गांधीबाग या भागांतील दुकानदारांकडे प्रचंड गर्दी बघायला मिळत आहे. येथील गल्यांमध्ये चालतांनाही ग्राहकांना रविवारी अडचणींचा सामना करावा लागत होता. दरम्यान व्यवसायिक म्हणतात, ‘पूर्वी ग्राहक फक्त साध्या माळा घ्यायचे, पण आता सगळ्यांना काहीतरी वेगळं आणि आकर्षक हवं असतं. स्मार्ट सिरीज लाइट्स, सेन्सर दिवे, आणि रंगबदलणारे बल्ब्स यांना विक्रमी मागणी आहे.’
इलेक्ट्रिक वस्तूंच्या खरेदीत कोट्यावधींची उलाढाल
यंदाच्या दिवाळीत ग्राहक ऊर्जा बचतीकडे अधिक झुकले आहेत. त्यामुळे सोलर आणि एलईडी उत्पादनांना मोठा प्रतिसाद मिळतोय. अनेक कंपन्या ‘ऊर्जा वाचवा उजेड वाढवा’ या संकल्पनेवर ऑफर्स देत आहे. त्याला ग्राहकही चांगला प्रतिसाद देत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दरम्यान प्रत्येक घराच्या बाल्कनीतून झगमगणाऱ्या माळा, दरवाजावरच्या सिरीज लाइट्स आणि बागेतील सोलर दिव्यांची लखलख, नागपूर शहराला सणाची जणू सोन्याची किनार देत आहे. ‘ऊर्जाबचतीसोबत उत्सवाचा आनंद’ हा संदेश देत, नागपूरची इलेक्ट्रिक बाजारपेठ या दिवाळीत नव्या तेजाने उजळली आहे.
करोनानंतर सर्वाधिक उत्साह
करोना काळात दिवाळीतही बाजारपेठ ओस दिसत होत्या. परंतु त्यानंतर हळू- हळू ग्राहकांमध्ये चैतन्य दिसत आहे. करोनानंतर यंदाच्या दिवाळीत सर्वाधिक ग्राहकांची गर्दी बघायला मिळत आहे. यंदा रंग बदलणाऱ्या व रिमोट कंट्रोल लाइट्सचा ट्रेंड जोरात आहे. या लाईट्सच्या विक्रीत ३० ते ३५ टक्क्यांची वाढ होण्याचा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. दिवाळीत खरेदीचा उत्साह प्रत्येक घराघरांत झळकतोच, पण यंदा इलेक्ट्रिक वस्तूंच्या व्यापारात जवळपास ३० ते ३५ टक्क्यांनी वाढ होईल, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. काही दुकानदारांनी दिवाळीच्या पहिल्याच आठवड्यात मागील वर्षाच्या तुलनेत दुप्पट उलाढाल झाल्याचे निरीक्षण नोंदवले.