अकोला : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राजकीय हालचालींना वेग आला. भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. अमरावती येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अकोल्यातील वंचित बहुजन आघाडीचे माजी नगरसेवक बबलू जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. बबलू जगताप यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने त्यांचा हा प्रवेश वादात अडकण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्येच गुन्हेगारी पार्श्वभूमीचे माजी नगरसेवक भाजपमध्ये दाखल झाल्याने टीका होत आहे.
राज्यातील बहुप्रतीक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याच्या दृष्टीने प्रशासकीय पातळीवर प्रक्रियेला वेग आला. आगामी ‘स्थानिक’ निवडणुकांसाठी इच्छुकांसह सर्वपक्षीय तयारी जोमाने सुरू आहे. या निवडणुकांसाठी सर्वच पक्ष कामाला लागले. वरिष्ठ नेतृत्वाकडून संघटनात्मक बांधणी केली जात आहे. पक्षांतर्गत नाराजीमुळे अनेक नेत्यांनी पक्षांतराची देखील वाट निवडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये अकोल्यातील वंचित बहुजन आघाडीचे माजी नगरसेवक बबलू जगताप यांनी सोमवारी अमरावती येथे भाजपमध्ये प्रवेश घेतला.
गेल्या काही महिन्यांपासून ते भाजपच्या संपर्कात होते. अखेर त्यांनी वंचित आघाडीला सोडचिठ्ठी देत भाजपचा झेंडा हाती घेतला. २०१७ मधील अकोला महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्र. तीनमधून बबलू जगताप वंचितच्या तिकीटावर निवडून आले होते. नवीन शहरातील बहुतांश प्रभागात भाजपचे संपूर्ण पॅनल निवडून आले असतांना प्रभाग तीन त्याला अपवाद ठरला होता. चारपैकी दोन भाजप व दोन ठिकाणी वंचितला यश मिळाले होते. त्याची सल भाजप नेतृत्वाच्या मनात कायम होती. अखेर वंचितच्या त्या माजी नगरसेवकालाच भाजपने पक्षप्रवेश दिला आहे.
निवडणुकीच्या काळात पक्षप्रवेश ही सर्वसामान्य बाब ठरते. मात्र, गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे बबलू जगताप यांच्या भाजप प्रवेशामुळे नव्या वादाला तोंड फुटू शकते. बबलू जगताप यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात जुगार प्रकरणात गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. एका हत्या प्रकरणाच्या आरोपातून ते कारागृहात देखील होते. राजकारणात सक्रिय झाल्यानंतर त्यांनी ओळख बदलण्याचा प्रयत्न केला आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असतांनाही थेट मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश झाल्याने राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त होत आहे. यापूर्वी देखील गुन्हेगाराला भाजप प्रवेश अकोला शहर भाजपमध्ये यापूर्वी देखील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला ऑगस्ट २०२३ मध्ये पक्षप्रवेश दिला होता. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.