अमरावती : शेतकरी कर्जमाफीच्‍या मुद्यावर प्रहार जनशक्‍ती पक्षाचे अध्‍यक्ष बच्‍चू कडू हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. गावोगावी सभा घेऊन ते शेतकऱ्यांना सज्ज होण्याचे आवाहन करीत आहेत. त्यातच त्यांनी समाज माध्यमांवर एक व्यंगचित्र प्रसारित करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. या व्यंगचित्राची चर्चा रंगली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय बंगल्यात तब्बल २०.४७ लाख रुपयांचा सोफा खरेदी करण्यात येणार असल्याचा आरोप विरोधकांनी केला असतानाच आता हाच मुद्दा बच्चू कडू यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून समोर आणला आहे. एका बाजूला सोफा आणि दुसऱ्या बाजूला ओल्या दुष्काळात हतबल शेतकरी असे हे व्यंगचित्र आहे.

राज्य सरकारने कर्जमाफीचा निर्णय तातडीने घ्यावा, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच इशारा दिला आहे. बच्चू कडू यांच्या नेतृत्वात येत्या २८ ऑक्टोबरला नागपूर शहरात कर्जमाफीच्या मागणीसाठी मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चात शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर आणि बैलगाड्यांसह सहभागी व्हावे, सरकारने मागणी मान्य केली नाही, तर नागपूर शहर जाम करू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर शहरातून बाहेर पडू दिले जाणार नाही. आम्ही नागपूरला चारही बाजूंनी घेरल्याशिवाय राहणार नाही, कर्जमुक्तीशिवाय आमचे पाय परतणार नाही, जेवढे दिवस थांबायचे, तेवढे दिवस नागपुरात थांबू, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.

बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. सर्व मतभेद विसरून शेतकरी एकत्र आले नाही, तर आगामी काळात मोठ्या संकटांना सामोरे जावे लागेल, असे त्यांनी म्हटले आहे. महायुती सरकारने कर्जमाफीच्या प्रश्नावर चालढकल सुरू केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. आता मात्र या प्रश्नावर राजकारण होत असल्याची खंत बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी ही जीवन मरणाचा विषय बनली आहे. राज्यभरात अतिवृष्टीने शेती आणि शेतकरी दोन्ही संकटात आहेत. यावेळी शेतकऱ्यांना मदत म्हणून कर्जमाफी होत नसेल, तर हे सरकार काय कामाचे असा प्रश्न बच्चू कडू यांनी केला. सरकारने जाहीर केलेले पॅकेज ही बनवाबनवी आहे. कर्जमुक्ती, शेतमालाला हमीभावाच्या वीस टक्के बोनस, दिव्यांगांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक, मच्छीमार, मेंढपाळांना न्याय मिळवून देण्यासाठी आमचा लढा आहे. मागण्या मान्य झाल्याशिवाय आता माघार घेणार नाही, असे बच्चू कडू यांचे म्हणणे आहे.