अमरावती : शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांगांच्या प्रश्नांवर गेल्या ८ जूनपासून अन्नत्याग आंदोलन करणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शनिवारी उपोषणाच्या सातव्या दिवशी आंदोलन स्थगितीची घोषणा केली. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, अशी आमची प्रमुख मागणी आहे. त्याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक आश्वासन दिले आहे. त्यांनी तारीख दिली नसली, तरी आम्ही आता कर्जमाफी आणि इतर मागण्यांसाठी येत्या २ ऑक्टोबरपर्यंत सरकारला वेळ देणार आहोत. त्यानंतरही मागण्या पूर्ण न झाल्यास गांधी जयंती दिनापासून भगतसिंह यांच्या शैलीनुसार तीव्र आंदोलन सुरू केले जाईल, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला.
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी गुरूकूंज मोझरी येथे उपोषणस्थळी पोहचून बच्चू कडू यांची भेट घेतली. त्यांनी यावेळी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मागण्यांच्या पूर्ततेसंदर्भातील पत्र वाचून दाखवले. उदय सामंत यांनी बच्चू कडू यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर बच्चू कडू यांनी हे आदोलन तूर्त स्थगित करण्यात येत असल्याचे जाहीर केले.
बच्चू कडू म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजूनही कर्जमाफीची तारीख जाहीर करण्यास तयार नाहीत. पण, आम्ही आता त्यांना २ ऑक्टोबरपर्यंतची वेळ दिली आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याप्रमाणे आंदोलन केले जाईल. सध्या पावसाचे दिवस आहेत. शेतकऱ्यांना पेरण्या कराव्या लागणार आहेत. या आंदोलनामुळे पेरण्या प्रभावित होण्याचे आणि शेतकऱ्यांचे वर्षभराचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने आपण आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. आपण १६ जूनपासून अन्नत्यागासोबतच जलत्याग आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला होता. पण माझी प्रकृती खालावली आहे. माझ्यासोबत अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांच्याही जिवाला धोका आहे. डॉक्टरांनी देखील उपचाराचा सल्ला दिला आहे. मी उपोषण सोडवावे, अशी विनंती शेकडो हितचिंतकांनी मोबाईलवर संदेश पाठवून केली आहे. काही कार्यकर्त्यांनी तर आम्ही कुटुंबासहित आत्महत्या करू, अशा प्रकारच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांचा आदर राखून आम्ही हे आंदोलन तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
बच्चू कडू म्हणाले, शेतकऱ्यांकडून होत असलेली सक्तीची कर्जवसुली थांबवावी, त्यांना नवीन कर्ज उपलब्ध करून द्यावे. आपल्या २५ मागण्यांपैकी २० मागण्या मान्य झाल्या आहेत. हे आंदोलनाला मिळालेले मोठे यश आहे. या पुढील आंदोलन मात्र तीव्र होणार आहे.