Bachchu Kadu : आगामी काळात अजित पवार यांचे अर्ध्याहून आधिक आमदार हे शरद पवार गटात जातील, असा दावा प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. तसेच लाडकी बहीण योजनेवरून सुरू असलेल्या श्रेयावादाच्या लढाईवरही त्यांनी भाष्य केलं आहे. बच्चू कडू यांनी आज अमरावतीत टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली.

नेमकं काय म्हणाले बच्चू कडू?

“आगामी काळात अजित पवार यांचे अर्धाहून आधिक आमदार हे शरद पवार गटात जातील. काही दिवसांनी अजित पवारदेखील तिकडे दिसू शकतात. त्यांना कुणीही अडवलेलं नाही. शेवटी हे राजकारण आहे. कधी कुणाच्या पारड्यात जाऊन बसायचं किंवा कुणाबरोबर राहायचं, हा ज्याचा त्याचा निर्णय आहे”, असं बच्चू कडू म्हणाले.

हेही वाचा – Bacchu Kadu : बच्चू कडूंनी समाजकल्याण अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली, ई-रिक्षा पहिल्याच दिवशी बंद पडल्याने संताप!

“राज्यात तीन पक्षांचं सरकार, श्रेयवादाची लढाई होणारच”

पुढे बोलताना त्यांनी लाडकी बहीण योजनेवरून सुरू असलेल्या श्रेयावादाच्या लढाईवरही भाष्य केलं. “राज्यात सध्या तीन पक्षांचे सरकार आहे. त्यामुळे श्रेयवादाची लढाई होणारच आहे. ते संयुक्तीक आहे. भाजपा म्हणतंय की लाडकी बहीण योजना आम्ही आणली, शिंदे गट म्हणतंय आम्ही आणली आणि अजित पवार यांचा पक्षही म्हणतोय की ती योजना आम्ही आणली. पण ही लाडकी बहीण योजना कुणी आणली, हे त्यानांच ठरवायचं आहे”, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.

नितीन गडकरींच्या ‘त्या’ विधानावर केलं भाष्य

यावेळी बोलताना त्यांनी नितीन गडकरी यांच्या विधानावरही प्रतिक्रिया दिली. विरोधकांनी आपल्याला पंतप्रधान पदाची ऑफर दिली होती, असं नितीन गडकरी म्हणाले होते. यासंदर्भात बोलताना, “नितीन गडकरी यांच्या विधानाचा अर्थ काँग्रेसकडे पंतप्रधान पदासाठी माणसं नाही, असं होतो”, असं ते म्हणाले.

हेही वाचा – Bachchu Kadu : “मुख्यमंत्र्यांचा गणपती करू”, या वक्तव्यावर बच्चू कडू यांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निवडणुकीत…”

“विधानसभेत तिसरी आघाडी नक्कीच दिसेल”

दरम्यान, बच्चू कडू यांनी छत्रपती संभाजीनगरनंतर मुंबईत मोर्चा काढण्याची घोषणा केली होती, याबाबत विचारलं असता, “तिसरी आघाडी म्हणून हा मोर्चा काढण्याचं आमचं ठरलं होतं. यासंदर्भात १९ तारखेला पुण्यात बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्या बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाईल”, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच “आगामी विधानसभा निवडणुकीत तिसरी आघाडी नक्कीच दिसेल”, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.