भंडारा : जिल्ह्यातील विकासकामांचे केंद्र आणि ग्रामीण विकासाचा मुख्य आधारस्तंभ असलेल्या मिनी मंत्रालयात अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे चोरांनी घुसखोरी करण्यास सुरुवात केली आहे. या मिनी मंत्रालयातून कुणी फाईल किंवा संगणक चोरी केला तर एक वेळ समजू शकतो, मात्र सध्या चोरट्यांची नजर या मिनी मंत्रालयातील वाहनांवर आहे. भंडारा (जिल्हा परिषद) मिनी मंत्रालयातून चक्क शासकीय वाहनांचे टायर चोरीला जात असल्याची माहिती समोर आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे हा प्रकार घडत असल्याचे बोलले जात आहे. जिल्ह्याचा कारभार हाकणारी यंत्रणाच सुरक्षित नसल्याचे यानिमित्ताने समाेर आले आहे.

भंडारा जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे इमारत व परिसरात पुर्णतः दुर्लक्ष होत असून नव्या अधिकाऱ्यांना मिनी मंत्रालय डोकेदुखी ठरत आहे. जिल्हा परिषद परिसरात चारचाकी वाहने पार्कीगमध्ये अनेक वाहने उभी आहे. यातील काही वाहने सुस्थितीत तर काही कालबाह्य झालेली वाहने भंगार अवस्थेत उभी आहेत. साधारणतः २० ते २५ वाहने कचराकाडीत भंगारवस्थेत उभी आहेत. मात्र यातील काही वाहनांची समोरील चाके चक्क चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नेमकी समोरीलच चाके गायब झाल्याने परिसरात चर्चा रंगू लागले आहेत.

जिल्हा परिषद प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या व राजकीय नेत्यांच्या वाहनांसाठी प्रशासकीय इमारतीच्या समोरच विस्तृत जागेत वाहन पार्कीगची व्यवस्था आहे. जिल्हा परिषदच्या अनेक सरकारी चारचाकी गाड्या आजारी पडल्याने त्या धुळखात भंगार अवस्थेत पडून आहेत. पार्कीग परिसराच्या बाहेर देखील अनेक वाहने भंगार झाले असून नजर ठेवणाऱ्यांनी अशा वाहनांचे एक-एक साहित्य गायब केल्याचे आढळले.

वाहन पार्कीग परिसरात असंख्य वाहने आजही धुळखात पडले असून अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणाने या वाहनांचे एक-एक साहित्य नजर ठेवणारेच गायब करीत असल्याचे बोलले जाते. त्यामुळे या दुर्लक्षित वाहनांच्या महागड्या साहित्यांवर हळुहळू हात साफ होत आहे. काही वाहनांचे तर समोरील टायर लोखंडी डिस्क सहित गायब झाल्याचे आश्चर्यजनक चित्र दिसत आहे.

धुळखात पडलेल्या वाहनांचे महागडे साहित्य हळुहळू गायब होत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांचे याकडे मात्र प्रचंड दुर्लक्ष आहे. त्यामुळे मिनी मंत्रालय ओळखली जाणारी जिल्हा परिषद प्रशासन आपल्याच परिसरातील वाहनांचे साहित्य गायब होण्या बाबत अनभिज्ञ असून अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असताना देखील अशा प्रकारे चोरी होत असेल तर सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत विचारणा करण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी नंदा गवळी यांना संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

जिल्हा परिषद प्रशासनात रंगरंगोटी, कक्ष सजावट व नाना प्रकारचे अनावश्यक खर्चाची सर्रास उधळपट्टी जोरात सुरु असून शासकीय वाहनांच्या चाकांची चोरी होण्यासारख्या गंभीर प्रकारांकडे मात्र दुर्लक्ष होणे, ही आश्चर्याची बाब आहे. यावरुन जिल्हा परिषद कार्यालयाचे परिसर किती सुरक्षित असणार? व संपूर्ण परिसराची व इमारतीची देखभाल नियंत्रण करणारे अधिकारी किती गंभीर असणार? याचा अंदाज वर्तविला जावू शकतो. अशा गंभीर प्रकारांवर नियंत्रण करणार कोण? असा प्रश्न विचारला जात आहे.