भंडारा : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभाग सज्ज झाला आहे. बनावट बियाणे, अवैध आणि विनापरवाना खते, जादा दराने खते, बोगस बियाणांची विक्री करणाऱ्यांवर थेट कारवाई केली जात आहे. दरम्यान बोगस खतांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा एका बाजार समितीचा कट कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्यांनी भंडाऱ्यात उधळून लावला. या प्रकारानंतर एकच खळबळ उडाली आहे.

शेतकऱ्यांची बाजार समिती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडाऱ्याच्या लाखनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कृषी केंद्रातून बोगस खतांची विक्री करण्यात येणार होती. मात्र, त्यापूर्वीच कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण पथक आणि मोहीम अधिकाऱ्यांच्या पथकानं धाड टाकून तब्बल १२९ मेट्रिक टन (१ लाख २९ हजार २५० किलो) ब्रह्मास्त्र भू सुधारक नावाचं खतं ताब्यात घेतलंय.

यात गुजरातच्या कंपनीसह नागपूरची पुरवठादार कंपनीवर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, या खताचं सॅम्पल अमरावती येथील प्रयोगशाळेत पाठविले आणि त्याचा अहवाल प्राप्त होताचं संपूर्ण साठा कृषी विभागाच्या पथकाने ताब्यात घेत त्याच्या विक्रीवर बंदी घातली.

खरिप हंगामात जिल्ह्यात बोगस कृषी उत्पादनांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचा प्रकार कृषी विभागाच्या कारवाईतून उघड झाला आहे.
या संदर्भात खताची निर्मिती करणारी गुजरातच्या भावनगर येथील फॉर्मडील इंडिया एलएलपी या कंपनीसह हे नागपूर येथील पुरवठादार क्रिसोलाईट प्रियांश ऍग्रो कंपनी आणि लाखनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एक सचिव अशा तिघांच्या विरोधात लाखनी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सध्या या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे. या धाडीच्याआधी विदर्भात इतर ठिकाणी किती प्रमाणात या खतांची विक्री झाली किंवा पुरवठा करण्यात आला? याचा शोध घेतला जात आहे. मात्र, भंडाऱ्याच्या फक्त एका तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात बोगस खत सापडल्यानं आता शेतकरी वर्गात खळबळ उडाली आहे.