अमरावती : मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्‍व भाजपलाही मान्‍य आहे, त्‍यामुळे आगामी निवडणूक एकनाथ शिंदे यांच्‍याच नेतृत्‍वात लढल्‍या जातील आणि भाजपच्‍याच सहकार्याने शिंदे हे राज्‍याचे मुख्‍यमंत्री होतील, असा दावा राज्‍याचे कृषीमंत्री अब्‍दूल सत्‍तार यांनी शुक्रवारी येथे केला. अमरावती विभागातील खरीप हंगाम नियोजनाच्‍या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना अब्‍दूल सत्‍तार म्‍हणाले, भाजप आणि शिवसेना सोबतच आहे. आम्‍ही सोबतच निवडणूक लढवणार आहोत, त्‍याविषयी शंका बाळगण्‍याची कोणतीही गरज नाही.

मुख्‍यमंत्रीपदासाठी राधाकृष्‍ण विखे पाटील यांचे नाव समोर केल्‍याच्‍या मुद्यावर अब्‍दूल सत्‍तार म्‍हणाले, माध्‍यमांनी आपल्‍या वक्‍तव्‍याचा विपर्यास केला आहे. राधाकृष्‍ण विखे पाटील हे आपले चांगले मित्र आहेत. ‘मी हनुमान असतो तर छाती फाडून दाखवले असते की माझ्या हृदयात विखे पाटील आहेत’, असे आपण म्‍हणालो होतो. ते केवळ मैत्रीपोटी. मुख्‍यमंत्रीपदासंदर्भात त्‍यांच्‍या नाव आपण घेतलेच नाही. राज्‍याचा मुख्‍यमंत्री मराठा चेहरा असावा, असे आपण सांगितले. एकनाथ शिंदे, रावसाहेब दानवे, हे देखील मराठा चेहरा आहेत, असे सत्‍तार म्‍हणाले.

हेही वाचा >>> अकोला : शिंदेंसोबत गेलेले अनेक आमदार नाराज!, नाराजी खासगीत व्यक्त करीत असल्याचा नितीन देशमुखांचा दावा

कोकणातील बारसू येथील प्रस्‍तावित प्रकल्‍पाविषयी विचारलेल्‍या प्रश्‍नावर माजी मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता अब्‍दूल सत्‍तार म्‍हणाले की, आमचे यापूर्वीचे जे नेते होते, त्‍यांनीच त्‍यावेळी जागा सुचवली होती. पण, आता सरकार त्‍यांच्‍या निर्णयाची अंमलबजावणी करीत असताना त्‍यांच्‍याकडून विरोध केला जात आहे. विकासाच्‍या कामात राजकारण करता कामा नये. निवडणुकीच्‍या वेळी विरोधक म्‍हणून आपण आपली भूमिका मांडू शकता, पण राज्‍याच्‍या विकासाच्‍या प्रकल्‍पांबाबत राजकारण करू नये. केवळ विरोधासाठी विरोध नको, असे सत्‍तार म्‍हणाले. हरभरा खरेदीचे उद्दिष्‍ट पणन विभाग आणि नाफेड मार्फत ठरवले जाते. त्‍यात कृषी विभागाचेही मत विचारात घ्‍यायला हवे. यापुढे खरेदीच्‍या विषयात योग्‍य समन्‍वय ठेवून निर्णय घेतले जातील, मुख्‍यमंत्र्यांशी चर्चा करून आपण हरभरा खरेदी पुन्‍हा सुरू करण्‍याचा प्रयत्‍न करू, असे सत्‍तार यांनी सांगितले.