नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करत त्यांना नागपूरचा कलंक म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपा कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. भाजपा शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके आणि माजी महापौर संदीप जोशी यांच्या नेतृत्वात व्हेरायटी चौकात आंदोलन करण्यात आले.
यावेळी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात घोषणा देत त्यांचा निषेध करण्यात आला. भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनीही उद्धव ठाकरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत निषेध नोंदविला. यावेळी प्रवीण दटके म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात केलेले वक्तव्य हे निषेधार्ह असून राज्याला तेच सध्या कलंक झाले आहेत. जाहीर सभेनंतर ते पळून गेले अन्यथा भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना सोडले नसते. यापुढे उद्धव ठाकरे यांना नागपुरात पाय ठेऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
हेही वाचा – विक्रीसाठी आणलेल्या दुर्मिळ प्रजातीच्या कासवाची सुटका, दोन आरोपींना अटक
तत्पूर्वी झाशीराणी चौकातून निषेध यात्रा काढण्यात आली. यात्रेत शहरातील आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.