वर्धा : गत १५ दिवसापासून सूरू असलेल्या पावसाने ग्रामीण भागाची दैना उडाली आहे. पिक वाहून गेले असून शेती खरवडून निघाली आहे. सततच्या पावसाने आहे त्या पिकाची वाढ खुंटली. उभी पिके आडवी झालीत. कापूस व तुरीत मर रोग पसरला. १ जून ते २३ सप्टेंबर या कालावधीत ९८८ मिमी पर्जन्यनोंद झाली असून सरासरीपेक्षा २१ टक्के अधिक आहे.
एकट्या सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा १३७ टक्के अधिक पाऊस झाल्याची नोंद आहे. जिल्ह्यातील ५४ पैकी ४० महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्हाभरात शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र आहे.
पण तरीही जिद्द ठेवून आहे ते पिक वाचले पाहिजे व उर्वरित काळ दोन वेळ जेवणाची सोय करता आली पाहिजे म्हणून काही धडपड करीत आहे. याचे एक कौतुकास्पद उदाहरण म्हणजे आष्टी तालुक्यातील बेलोरा येथील युवा शेतकरी आकाश रमेशराव रानोटकर यांचे होय. त्यांची हरिशवाडा येथे एक हेक्टरवर मोसंबीची बाग आहे. दरवर्षी ते दीड ते दोन लाखाचे उत्पन्न घेतात.
पण यावेळी पावसाने बागेत धिंगाणा घातला आणि आकाश यांचे कुटुंब चिंतेत पडले. टवटवीत मोसंबी काढायला आली असतांनाच पावसाचे तांडव सूरू झाले. मोसंबी विकता येईना. व्यापारी यायला तयार नव्हते. कारण पुराणे वेढलेले शेत. मधात मोठा नाला. त्याची दुरुस्ती कधीच केल्या गेली नाही.
म्हणून मग रानोटकर यांनी फळ व्यापाऱ्यास गळ घातली. तुम्ही माल घ्या मी आणून देतो. काही सोबत घेत रानोटकर यांनी मोसंबी तोडून क्रेटमध्ये भरली. डोक्यावर घेत ती वाहत्या नाल्यातुन डोक्यावर वाहून बाहेर काढली. या भागात साप विचवांचा सुळसुळाट. पण त्याची तमा नं बाळगता दोन दिवस हे मोसंबी वाचविण्याचे प्रयत्न झाले.
आकाश रानोटकर म्हणतात की ही मोसंबी दोन लाख रुपये किमतीची आहे. पण झालेली अतिवृष्टी व संभाव्य पाऊस म्हणून लगेच तोड करावी लागली. तोड झाली पण रस्त्यावर आणता येत नसल्याने स्वतः वाहून आणावी लागली. कसेबसे ३० हजार रुपये द्यायला व्यापारी तयार झाला. पावसाने व त्यामुळे शेत नाल्यांना आलेल्या पुराने वाईट स्थिती झाली आहे. कोण विचारतो आम्ह्लाला ? भाव तर मिळतच नाही पण पावसाने उभी संकटे दूर करायला पण कोणी येत नाही, अशी भावना रानोटकर व्यक्त करतात.
जिल्ह्यात अशी स्थिती असतांना पंचनामे करीत त्वरित मदत देण्याची भूमिका सर्वप्रथम आमदार राजेश बकाने यांनी मांडून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. तसेच इतर आमदारांना यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याची विनंती पण केली. पण सगळे ढिम्म. शेतकरी नेते रवीकांत तुपकर, किरण ठाकरे, मंगेश घुंगरूड यांनी मोठा मोर्चा काढून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली.
शेतकरी संघटनेच्या सरोज काशीकर यांनीही लक्ष वेधले. किसान अधिकार अभियानचे अविनाश काकडे तर पदोपदी मदतीची मागणी करीत आहे. शेतकरी नेते आक्रमक तर लोकप्रतिनिधी गरबा दांडियात व्यस्त, असे चित्र दिसून येते. रानोटकर यांच्यासारख्या शेतकऱ्यांनी आता आपले ओझे आपणच वाहून नेण्याची भूमिका घेऊन टाकली आहे.