लोकसत्ता टीम
भंडारा : तब्बल दहा वर्षाने मोठ्या असलेल्या गावातीलच एका विधवा महिलेवर त्याचे प्रेम जडले आणि दोघांमध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले. मात्र एके दिवशी दोघांमध्ये वाद झाला आणि आरोपी तरुणाने विधवा महिलेचा नॉयलॉन दोरीने गळा आवळून निर्घृणपणे खून केला. ही धक्कादायक घटना लाखनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोगरा/शिवणी या गावात २१ मार्च रोजी घडली. पुष्पा रामेश्र्वर बनकर (वय ३७) असे मृत महिलेचे नाव असून खुशाल पुरुषोत्तम पडोळे (वय २७ वर्षे) असे आरोपी तरुणाचे नाव आहे.
मृतक व आरोपी एकाच गावातील रहिवासी आहेत. मृतक पुष्पा बनकर ही भाजीपाल्याचा व्यवसाय करून आपल्या दोन मुलांचा सांभाळ करीत होती. काही वर्षापूर्वी तिच्या पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. दरम्यान, शुक्रवारी दुपारच्या सुमारास आरोपी खुशाल पडोळे याने तिला शेतशिवारातील नाल्याकडे बोलावले आणि नंतर आरोपीने दोरीने गळा आवळून तिचा निर्घृण खून केला.
मृतक पुष्पा व आरोपीचे मागील अडीच वर्षांपासून अनैतिक संबंध असल्याची माहिती समोर येत आहे. मोगरा येथील नाल्याजवळ मृतक महिलेचे शेत असून शेतात उन्हाळी धान पिकाची लागवड केली आहे. घटनेच्या दिवशी मृतक महिला ही शेतात धान पिकाची पाहणी करण्यासाठी गेली होती. थोड्या वेळाने आरोपी तिथे गेला. यादरम्यान दोघात वाद झाला. या वादातून आरोपीने मृतकाच्या शेतालागत असलेल्या सागवनाच्या वाडीत दोरीने गळा आवळून विधवेचा निर्घृणपणे खून केला.
यानंतर आरोपीने लाखनी पोलीस ठाणे गाठले व हत्येची कबुली दिली. लगेच पोलीस घटनस्थळी दाखल झाले व घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे पाठविले. घटनेचे गांभीर्य ओळखून अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी आनंद चव्हान,पोलिस निरीक्षक हृदयनारायण यादव व लाखनी पोलिस ठाण्याची चमू घटनास्थळी दाखल झाली होती. प्रकरण गंभीर असल्याने फॉरेन्सिक चमूला पाचरण करण्यात आले होते.वृत्त लिहीपर्यंत लाखनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
© The Indian Express (P) Ltd