बुलढाणा : कायद्याचे रक्षक असलेल्या जिल्हा पोलीस दलातील आयकर परतावा घोटाळा उघडकीस आला आहे. आयकर विभागाने तब्बल १६३३ पोलीस कर्मचाऱ्यांना नोटीसा बजावल्या असून पोलीस अधीक्षकांनी या सुनियोजित घोटाळ्याची गंभीर दखल घेत कर्मचाऱ्यांना तंबी दिली आहे. यामुळे पोलीस विभागासह जिल्ह्याच्या प्रशासकीय वर्तुळात अभूतपूर्व खळबळ उडाली आहे.

तब्बल १६३३ पोलीस कर्मचाऱ्यांना आयकर विभागाने नोटिशी बजावल्या असून, चुकीच्या पद्धतीने भरलेल्या आयकर विवरणपत्रांमुळे (आयटीआर) या कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे. या संपूर्ण घोटाळ्याचे धागेदोरे स्थानिक सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाउंटंट) विष्णू मुळे यांच्यापर्यंत पोहोचले असल्याचा धक्कादायक निष्कर्ष प्राथमिक तपासात समोर आला आहे.

सदर प्रकरणात नागपूर येथील सहाय्यक आयकर आयुक्त ( आय एन व्ही) यांनी २३ ऑक्टोबर २०२५ रोजी पत्र जारी करत विष्णू मुळे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांचे आयकर परतावे चुकीच्या पद्धतीने भरल्याची कबुली दिली असल्याचे नमूद केले . मुळे यांनी अनेक पोलीस कर्मचाऱ्यांचे विवरणपत्र स्वतच्या संगणकावरून सादर केले असून बेकायदेशीर कपाती दाखवून त्यांना चुकीचा कर लाभ मिळवून दिला. आयकर विभागाने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब उघडकीस आली असून, ही एक साखळी स्वरूपातील फसवणूक असल्याची शक्यता जाणकारा कडून व्यक्त केली जात आहे.

यावर कळस म्हणजे काही अधिकाऱ्यांनी २०२२, २०२३, २०२४ आणि २०२५ या सलग चार वर्षांचे आयटीआर एकाच पद्धतीने दाखल केले असल्याचे आढळले. म्हणजेच, चुकीची पद्धत योजनाबद्ध रितीने राबवली गेली, असे आयकर विभागाच्या अहवालात स्पष्टपणे नमूद आहे. या प्रकरणात काही चार्टर्ड अकाउंटंट्स आणि मुळे यांच्यातील संगनमताची शंका देखील व्यक्त करण्यात आली आहे. याची गंभीर दखल घेत बुलढाणा पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांच्या कार्यालयाने जारी केलेल्या वायरलेस संदेशानुसार, संबंधित सर्व पोलिस अधिकाऱ्यांना तत्काळ सुधारित आणि योग्य आयटीआर दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दुसरीकडे आयकर विभागाने “निर्देशांचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल” असा कडक इशारा दिला आहे

या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्हा पोलिस दलात मोठी अस्वस्थता पसरली असून, आयटीआर चुकीने भरल्यामुळे सेवा नोंदीवर परिणाम होण्याची भीती अनेक पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. नागरिक आणि करदाते यांचे लक्ष या घोटाळ्याकडे वेधले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांनीच अन तेही कायद्याचे रक्षक समजल्या जाणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनीच कायद्याची पळवाट शोधण्याचा प्रयत्न केल्याने पोलीस प्रशासनाच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अधीक्षक म्हणतात, “चुकीला माफी नाही”

याप्रकरणी पोलीस अधीक्षक नीलेश तांबे चांगलेच गंभीर झाले असून त्यांनी उपरोक्त अधिकारी आणि कर्मचान्यांना आपले आयटीआर तपासून त्यामध्ये चुका असल्यास सुधारित विवरणपत्र तात्काळ दाखल करण्याचे निर्देश दिले आहे. सोबतच बनावट सवलती घेणारे कर्मचारी व ते तयार करणारे सल्लागार यांना समान जबाबदार धरत ज्या कर्मचाऱ्याला आयकर विभागाकडून दंड किंवा नोटीस मिळेल, त्याच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्याचा गंभीर इशारा देखील दिला आहे, हे उल्लेखनीय.