बुलढाणा : बुलढाणा लोकसभा मतदारसंघावरून जिल्ह्यातील महाविकास आघाडीत उघडपणे जुंपली असतानाच आता युतीमध्ये “शीत युद्ध”सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. मिशन ४५ ने डोकेदुखी वाढविली असतानाच लोकसभा निवडणूक प्रमुखपदी कट्टर पारंपरिक विरोधकाची नियुक्ती केल्याने शिंदे गट अस्वस्थ झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सन १९९६ पासून शिवसेनेचा गड असलेल्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा ‘मिशन’मध्ये समावेश करून भाजपाने शिंदे गटाला कमी अधिक एक वर्षापूर्वी चकित केले. सुरुवातीला याला गांभीर्याने न घेणाऱ्या शिंदे गटाला नंतर मात्र दखल घेणे भाग पडले. केंद्रीय भुपेंद्र यादव यांनी मागील सुमारे ९ महिन्यांत तिसऱ्यांदा मतदारसंघाला भेट देत भाजपा नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्याना ‘ चार्ज’ केलं. त्यांनी मतदारसंघ पालथा घालून सूक्ष्म अभ्यास केला.

हेही वाचा – यवतमाळ : अविश्वसनीय.. रस्त्यांवरील खड्ड्याचा फोटो काढा अन् अपलोड करा! शासनाच्या खड्डेमुक्त योजनेसाठी स्वतंत्र ॲप

विळा- भोपळ्याचे सख्य!

यामुळे शिंदे गट प्रामुख्याने खासदार प्रतापराव जाधव यांची डोकेदुखी प्रचंड वाढली आहे. यात लोकसभा निवडणूक प्रमुखांच्या नियुक्तीवरून युतीअंतर्गत वादंग उठण्याची चिन्हे आहे. आजपासून सुरू झालेल्या यादव यांच्या ‘लोकसभा प्रवास’च्या पूर्वसंध्येला प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी या नियुक्त्या जाहीर केल्या. हा निश्चितच योगायोग नाही, असे मानले जात आहे. शिंदे गटाच्या मतदारसंघातही प्रमुख नियुक्त करण्यात आल्याने शिंदे गटाच्या भुवया उंचावल्या आहेत. बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी माजी आमदार विजयराज शिंदे यांची नियुक्ती करून भाजपाने धक्का दिला आहे. पूर्वाश्रमीचे शिवसेना नेते असलेले शिंदे हे पक्षात असल्यापासून जाधवच नव्हे आमदार संजय गायकवाड यांचे कट्टर विरोधक आहे. त्यांच्यातून विस्तवही जात नाही. अनेक वर्षांचे हे हाडवैर शिंदे भाजपावासी झाल्यावरही कायम आहे. त्यांची नियुक्ती या दोन नेत्यांना बोलणारी ठरावी अशीच आहे.

हेही वाचा – अमरावती: चिखलदरा SKY WALK उभारणीचा मार्ग मोकळा; पावसाळ्यानंतर सुरू होणार काम

नियुक्त्या की स्वबळाची तयारी?

विधानसभा मतदारसंघप्रमुख यांच्याही नियुक्त्या करण्यात आल्या आहे. मलकापूर शैलेश मिरगे, बुलढाणा योगेंद्र गोडे, चिखली सुनील वायाळ, सिंदखेडराजा गजानन घुले, मेहकर (एससी राखीव) प्रकाश गवई, खामगाव संजय शिंगारे, जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघासाठी गजानन सिसोदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाने लोकसभा व विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रमुख नेमून या सर्व मतदारसंघात स्वबळावर लढण्याची तर तयारी केली नाही ना? असा प्रश्नही आता ऐरणीवर आला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Buldhana lok sabha responsibility to opposition shinde group upset by bjp tactics scm 61 ssb