सुसज्ज स्वागत केंद्रापाठोपाठ महानगरातील पर्यटक आणि अभ्यासकांसाठी आता लोणावर सरोवर येथे ‘कॅराव्हॅन’ (home on wheels-फिरतं घर) सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुसज्ज वाहनामुळे पर्यटकांचा प्रवास सुकर होणार आहे.
जगप्रसिद्ध खाऱ्या पाण्याचे लोणार सरोवर हे भूगर्भीयदृष्ट्या तसेच जैवविविधतेच्या दृष्टीने जगातील एकमेव अद्वितीय सरोवर मानले जाते. लोणार सरोवर आता ‘कॅराव्हॅन’ सेवेच्या माध्यमातून पर्यटकांसाठी आणखी सुलभ, आकर्षक व रोमांचक ठरणार आहे. लोणार येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) माध्यमातून ‘कॅराव्हॅन’ सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
लोणार शहराला दरवर्षी हजारो देशी विदेशी पर्यटक भेट देतात. अंदाजे ५२ हजार वर्षांपूर्वी उल्कापातामुळे निर्माण झालेले लोणार सरोवर हे जगातील एकमेव खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. वैज्ञानिक, धार्मिक तसेच पर्यावरणीय दृष्टिकोनातून त्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. लोणार सरोवराच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध उपाययोजना आखण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून पर्यटकांसाठी आता ‘कॅराव्हॅन’ सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
काय आहे कॅराव्हॅन?
‘कॅराव्हॅन’ म्हणजे एक सुसज्ज वाहन. यात पर्यटकांना राहण्यासाठी प्रशस्त जागा, भोजन सुविधा, वॉशरूम आणि अन्य पूरक आधुनिक सोयीसुविधा उपलब्ध आहेत. एका अर्थाने हे एक ‘चालते फिरते महाल’ समजले जाते. पर्यटकांना ठराविक ठिकाणी थांबवून सरोवराचे मोहक दृश्य, आजूबाजूचे नैसर्गिक सौंदर्य व प्राचीन स्थळांचा मनमुराद आनंद घेता येणार आहे. पर्यटकांना सरोवराभोवतीची प्राचीन मंदिरे, शहरातील ऐतिहासिक वास्तू व नैसर्गिक वातावरण आकर्षित करते. आतापर्यंत सरोवराची फेरी पायदळ फिरणे कठीण होते. मात्र, या ‘कॅराव्हॅन’ सेवेमुळे पर्यटकांना सहज, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाशी संपर्क करून मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर येथून पर्यटकांना या सुविधेद्वारे लोणार येथे येता येणार आहे. नुकतेच पहिली ‘कॅराव्हॅन’ नाशिक व छत्रपती संभाजीनगर मार्गे लोणारला आली. यामुळे लोणार सरोवरला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढणार आहे. रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होऊन त्याचा लाभ स्थानिक व्यापारी, हॉटेल व्यवसाय, मार्गदर्शक तसेच पर्यटनाशी निगडीत उद्योगांना होणार आहे.
मावळत्या सूर्याचे दृश्य पाहण्याची सुविधा हवी
लोणार सरोवरावर मावळत्या सूर्याचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटक येत असतात. वर्षभर साधारणतः संध्याकाळी सहा वाजतादरम्यान हा कालावधी असतो. मात्र, ही स्थळे पाच वाजताच बंद केली जात असल्याने पर्यटक नाराज होत आहेत. लोणार येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल यांनी भेट दिली. यावेळी सरोवराच्या परिसरातून मावळत्या सूर्याचे दृश्य पाहता यावे, यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधिंनी त्यांच्याकडे केली. त्याला जयस्वाल यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
लोणार सरोवर हे महाराष्ट्राच्या पर्यटनाचा अमूल्य ठेवा आहे. ‘कॅराव्हॅन’ सेवेच्या माध्यमातून या अद्वितीय स्थळाची भव्यता अधिकाधिक पर्यटकांपर्यंत पोहोचवणे, तसेच त्यांना दर्जेदार सेवा देणे हे आमचे उद्धीष्ट असल्याचे जयस्वाल यांनी सांगितले.
पर्यटक स्वागत केंद्राचे काम पूर्ण
शहरात पर्यटकांसाठी उभारण्यात आलेल्या स्वागत केंद्राचे काम पूर्ण झाले आहे. सरोवर विकासाच्या ४६५ कोटींच्या आराखड्यांतर्गत ४ कोटी ५० लाख रुपयांचा हा प्रकल्प आहे. जुन्या तहसील कार्यालयाच्या जागेवर उभारलेले हे आधुनिक केंद्र पर्यटन सुविधांसाठी नवा अध्याय ठरणार
आहे. येथे माहिती, विश्रांती व मनोरंजन यांची एकत्रित सोय उपलब्ध राहणार आहे. कॅफेटेरिया भोजन व नाश्त्याची सुविधा, थ्रीडी सिनेमा हॉल, लोणार सरोवराच्या उत्पत्तीवर आधारित माहितीपट, व्हीआयपी लॉन्ज, विशेष पाहुण्यांसाठी स्वतंत्र कक्ष, स्वच्छतागृहे, विसावा गृह व वाहनतळ या सुविधा उपलब्ध होणार आहे. यापाठोपाठ पर्यटकांचा मुक्काम वाढेल आणि स्थानिक व्यवसायालाही चालना मिळणार आहे.