अकोला : उन्हाळा व सुट्ट्यातील गर्दीच्या काळात प्रवाशांना मध्य रेल्वे प्रशासनाने मोठा दिलासा दिला. बडनेरा जंक्शन ते नाशिक रोड आणि खंडवा जंक्शन ते सनावद विशेष गाड्यांच्या सेवांचा कालावधी वाढविण्यात आला. या रेल्वे मार्गावर प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. मात्र, विशेष रेल्वे गाड्यांचा कालावधी वाढल्यामुळे गर्दीच्या काळात प्रवाशांना मोठी सुविधा होणार आहे.

उन्हाळ्यामध्ये शाळांना सुट्ट्या लागत असल्याने बाहेर गावाला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी राहते. सोबतच या सुट्ट्यांच्या कालावधीमध्ये लग्नसराई देखील असते. त्यामुळे रेल्वे गाड्यांमध्ये तुडुंब गर्दी दिसून येते. अनेक महिने अगोदरच रेल्वेचे आरक्षण देखील फुल्ल होऊन जाते. या गर्दीच्या काळात प्रवाशांचे प्रचंड गैरसोय होते. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन त्यांची गैरसोय टाळण्यासाठी विशेष गाड्यांच्या सेवांचा कालावधी वाढविण्यात आला आहे.

गाडी क्रमांक ०१२११ बडनेरा जंक्शन ते नाशिक रोड अनारक्षित दैनिक विशेष ३० एप्रिलपर्यंत चालविण्याची सूचना देण्यात आली होती. ही विशेष गाडी आता ०१ मेपासून ३० जुनपर्यंत वाढवण्यात आली आहे. या विशेष गाडीच्या ६१ सेवा होतील. गाडी क्रमांक ०१२१२ नाशिक रोड ते बडनेरा जंक्शन अनारक्षित दैनिक विशेष पूर्वी ३० एप्रिलपर्यंत चालविण्याची सूचना देण्यात आली होती. ही विशेष गाडी आता ०१ मेपासून ३० जुनपर्यंत धावणार आहे. या गाडीच्या देखील ६१ सेवा होतील.

गाडी क्रमांक ०१०९१ खंडवा जंक्शन ते सनावद अनारक्षित विशेष गाडी २९ एप्रिलपर्यंत चालविण्याची सूचना देण्यात आली होती. ती गाडी आता ०२ मेपासून ३० जुनपर्यंत वाढविण्यात आली आहे. या गाडीच्या ४४ सेवा होतील. गाडी क्रमांक ०१०९२ सनावद ते खंडवा जंक्शन अनारक्षित गाडी २९ एप्रिलपर्यंत चालविण्याची सूचना देण्यात आली होती, ती गाडी आता ०२ मेपासून २४ जुनपर्यंत वाढवण्यात आली आहे. या गाडीच्या देखील ४४ सेवा होतील. धावण्याचा कालावधी वाढवण्यात आलेल्या या गाड्यांच्या वेळेत आणि थांब्यात कोणताही बदल केलेला नाही.

सामान्य शुल्कासह अनारक्षित डब्ब्यासाठी तिकिटे यूटीएस ॲपद्वारे घेता येतील. या विशेष गाडीच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला द्यावी, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या विशेष रेल्वे गाड्यांचा कालावधी वाढल्याने प्रवाशांच्या गर्दीवर नियंत्रण येणार आहे.