लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चंद्रपूर : या जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघापैकी चंद्रपूर हा अनुसूचित जातीसाठी राखीव मतदार संघ तथा वरोरा व ब्रम्हपुरी असे तीन विधानसभा मतदार संघावर आमचा दावा आहे. महायुतीच्या बैठकीत तिन्ही मतदार संघ आम्ही शिंदे शिवसेना साठी मागणी करणार असल्याची माहिती शिंदे शिवसेनेचे विदर्भातील नेते आमदार कृपाल तुमाने यांनी दिली.

शिंदे शिवसेना बैठकीचे आयोजन चंद्रपूर शहरात केले असता आमदार कृपाल तुमाने येथे आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना तुमाने यांनी विधानसभा निवडणुक संदर्भात चर्चा केली. तुमाने म्हणाले, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ब्रम्हपुरी व वरोरा मतदार संघातून शिवसेना उमेदवार निवडणूक लढले होते. ब्रम्हपुरी संदीप गड्डमवार तर वरोरा मधून माजी मंत्री संजय देवतळे यांनी शिवसेना पक्षाकडून निवडणूक लढली होती. त्यामुळे या दोन्ही मतदार संघावर शिवसेना शिंदे यांचा दावा राहणारच आहे. त्यातच चंद्रपूर मतदार संघावर शिवसेना शिंदे यांचा पहिला डाव राहणार आहे. चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार महायुती सरकार मध्ये सहयोगी सदस्य आहेत. त्यामुळे शिंदे शिवसेना चंद्रपूर विधानसभा मतदार संघावर दावा करणार आहे असेही आमदार तूमाने म्हणाले.

आणखी वाचा-विवाहित प्रियकरासाठी संसार मोडला अन् आता…

दरम्यान विधानसभा निवडणुकीची चाहूल लागताच चंद्रपूर विधानसभा क्षेत्राची चर्चा चांगलीच रंगली आहे. हा मतदार संघ अनु. सूचीत जातीसाठी राखीव आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी मोठ्या मताधिकाने विजय प्राप्त केला होता .मात्र लोकसभा निवडणुकीनंतर समीकरण बदलली आहेत. जोरगेवार यांच्यासाठी काँग्रेसकडून दरवाजे बंद झाले आहे. त्यामुळे महायुतीच्या आधार घेण्यासाठी जोरगेवार यांनी प्रयत्न सुरू केल्याची माहिती आहे त्यातच आता शिवसेना शिंदे गटाचे आमदार कृपाल तुम्हाणे यांनी चंद्रपूर मतदार संघावर शिंदे सेनेचा दावा सांगितला आहे.

आणखी वाचा-यवतमाळच्या गुन्हेगारीचा दिल्लीत डंका!

विशेष म्हणजे चंद्रपुरात शिवसेना शिंदे गटाचा फार प्रभाव नाही. कार्यकर्त्यांची भक्कम फळी सुद्धा नाही. त्यामुळे जोरगेवारांचा कल भाजपकडे जास्त आहे. मात्र योगायोगाने चंद्रपूर विधानसभेची जागा शिंदे गटाला मिळाली. तरी भाजपाचे कार्यकर्ते किती प्रामाणिकपणे कार्य करतात यावरच बहुतांश गणित अवलंबून असेल. दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी २०१४ मध्ये शिवसेना पक्षाकडून चंद्रपूर विधानसभा निवडणुक लढविली होती. तेव्हा जोरगेवार यांना ५२ हजाराचे मताधिक्य मिळाले होते. विशेष म्हणजे तेव्हा उध्दव ठाकरे व विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्र होती.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrapur bramhapuri warora claimed by shinde sena rsj 74 mrj