राज्याचे बहुप्रतिक्षित खातेवाटप रविवारी सायंकाळी जाहीर झाले. भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य संवर्धन खाते मिळाले आहे. मात्र, मुनगंटीवार यांना महत्त्वाची आणि समाधानकारक खाती मिळाली नाहीत, अशी टीका माजी मंत्री, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. यावर, कोणतेही खाते छोटे किंवा मोठे नसते, अशा शब्दात मुनगंटीवार यांनी वडेट्टीवार यांना प्रत्युत्तर दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिल्ह्यात भाजप व काँग्रेस नेते नेहमीच एकमेकांविरोधात दंड थोपटून असतात. आता तर मंत्रिमंडळ खातेवाटपावरून जिल्ह्यातील दोन दिग्गज नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगल्याचे चित्र आहे. ‘अनेकांनी मोठमोठी स्वप्ने बघितली. खातेवाटपानंतर या स्वप्नांचा भंग झाला आहे. गगन भरारी घेताना पंखात बळ आहे का, हे आधी बघावे. जिल्ह्याला समाधानकारक खाती मिळाली नाहीत, अन्यायच झाला. यापूर्वी चांगली खाती मिळाली नाहीत म्हणून हिणवले जायचे. मात्र, आम्ही हिनवणार नाही,’ अशी टीका वडेट्टीवार यांनी मुनगंटीवार यांच्यावर केली.

वडेट्टीवार यांच्या टीकेला मुनगंटीवार यांनीही प्रत्युत्तर दिले. कोणतेही खाते छोटे किंवा मोठे नसते. राज्यात एकूण ५० विभाग आहेत. वन खात्याचे महत्त्व सांगायची गरज नाही. नोटा मोजत असताना श्वास बंद झाला तर वन खाते महत्त्वाचे की धनखाते, हे कळेल. वनाचा संबंध हा जीवनाशी आहे. ‘वन है तो जल हे, जल है तो इंसान का कल है,’ अशा शब्दात त्यांनी वडेट्टीवार यांची टीका खोडून काढली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrapur dispute between vadettiwar mungantiwar over account sharing amy