चंद्रपूर: मोरवा येथील शेतकरी परमेश्वर ईश्वर मेश्राम (५५) याने २६ सप्टेंबर रोजी तहसील कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. उपचारादरम्यान तब्बल ११ दिवस जीवन-मरणाशी झुंज दिल्यानंतर सोमवार ६ ऑक्टोबर रोजी पहाटे ३ वाजता चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
जोपर्यंत शेती नावाने करून देत नाही तोवर मृतदेह उचलणार नाही अशी भूमिका शेतकऱ्याची पत्नी व मुलीने घेतल्याने दोन दिवसांपासून शेतकऱ्याचा मृतदेह जिल्हा रूग्णालयातील शवपेटीत पडून आहे. तर जिल्हाधिकाऱ्यांनी आठ दिवसात शेत जमिन नावाने करून देतो असे आश्वासन दिले आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणात कॉग्रेस खासदार प्रतिभ धानोरकर व भद्रावतीचे माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांचा दबाव असल्याचा आरोप मृत शेतकऱ्याची पत्नी वंदना परमेश्वर मेश्राम यांनी केला आहे.
मोरवा येथील शेतकरी परमेश्वर मेश्राम यांंच्या आत्महत्येनंतर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील दोषी तहसीलदार राजेश भांडारकर आणि नायब तहसीलदार सुधीर खांडरे यांच्यावर यापूर्वीच निलंबनाची कारवाई केली आहे. तसेच या दोघांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
या प्रकरणात सविस्तर असे की मोरवा येथील मृतक शेतकरी परमेश्वर मेश्राम आणि त्यांच्या वारसांची नावे न्यायालयाच्या स्पष्ट आदेशानुसार गाव नमुना ७ मध्ये नोंदविली जाणे आवश्यक होते. मात्र, महसूल विभागाने “मालकी हक्काबाबत वाद आहे” असे कारण सांगत आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केली. तहसीलदाराने दीर्घकाळ प्रकरण प्रलंबित ठेवल्याने परमेश्वर मेश्राम मानसिक तणावाखाली गेले आणि शेवटी त्यांनी २६ सप्टेंबर रोजी तहसील कार्यालयातच विष प्राशन करून आपले जीवन संपविण्याचा प्रयत्न केला.
उपचारादरम्यान मेश्रान यांचा मृत्यू झाला. मृतक अर्जदार परमेश्वर विश्वनाथ मेश्राम (५५) यांनी कुरोडा येथील सर्वे नंबर ८६, ८७, ९५, ९८ मधील शेतजमिनीवर २०१५ च्या न्यायालयीन आदेशानुसार वारसांची नावे अभिलेखात नोंदविण्याची मागणी केली होती. मात्र अधिकाऱ्यांनी आदेशाची अंमलबजावणी केली नाही. अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतरही न्याय न मिळाल्याने निराश झालेल्या परमेश्वर मेश्राम तहसील कार्यालयात विषप्राशन केले. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी नीले असता त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने या प्रकरणाची गंभीर दखल घेत महाराष्ट्र शासनाने तहसीलदार राजेश भांडारकर व नियब तहसीलदार सुधीर खांडरे यांना निलंबित केले. दरम्यान ६ ऑक्टोंबर रोजी शेतकरी परमेश्वर मेश्राम यांचा जिल्हा रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
आता मृतकाची पत्नी वंदना परमेश्वर मेश्राम यांनी पतीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला आहे. पत्नी वंदना हिने माध्यमांशी बोलतांना शेतजमिनीचा सातबारा नावाने करून द्यावा, शेतीवर ताबा द्यावा त्यानंतरच मृतदेह स्वीकारणार असे सांगितले. जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सात दिवसात सातबारा व अन्य कादगपत्रे तयार करून देवू असे आश्वासन दिले आहे. मात्र पत्नी वंदना काहीही ऐकण्यास तयार नाही.
पती जिवंत होते तेव्हाच जिल्हाधिकाऱ्यांनी राजकिय दबावात काही केले नाही, मग आता काय करणार असा प्रश्न उपस्थित करून मृतदेह उचलणार नाही असे स्पष्ट सांगितले. त्यामुळे मृत शेतकऱ्याचा मृतदेह जिल्हा रूग्णालयातील शवागारात पडून आहे. दरम्यान मृत शेतकरी परमेश्वर मेश्राम यांनी त्यांची शेती माजी खासदार बाळू धानोरकर यांना विकली होती. त्यानंतर धानोरकर यांनी सदर शेती त्यांचे मोठे बंधू अनिल धानोरकर यांना विकली. सध्या शेती ही कागदोपत्री बाळू धानोरकर यांच्या नावाने असली तरी ताबा अनिल धानोरकर यांचा आहे. दरम्यान या प्रकरणात कॉग्रेस खासदार प्रतिभा धानाेरकर व माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांचा दबाव असल्यामुळे शेतीचा सातबारा नावाने होत नसल्याचा आरोप मृत शेतकऱ्याची पत्नी वंदना मेश्राम हिने केला आहे.