चंद्रपूर : प्रादेशिक परिवहन विभागाच्या लक्कडकोट तपासणी नाक्यावर तोतया पत्रकार बनून ट्रक चालकांकडून खंडणी मागणारे व महिला मोटर वाहन निरीक्षक योगीता अभिजीत राणे या महिला शासकीय अधिकाऱ्याला धमकावणारे आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयूर अनिल राईकवार आणि अर्जुन ऊर्फ सन्नी हरविंदरसिंह धुन्ना या दोन जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी योगीता अभिजीत राणे, मोटार वाहन निरीक्षक, प्रादेशिक परिवहन विभाग, चंद्रपूर यांनी पोलीस ठाणे विरुर येथे बुधवारी तक्रार नोंदवली की, मौजा लक्कडकोट तपासणी नाका येथे कर्तव्यावर हजर असताना त्यांना माहिती मिळाली की, एक ग्रे कलरची अर्टिका वाहन क्र. एमएच ३४-बीआर-१८७८ मधील इसम हे ट्रकवाल्याकडून पैसे घेतात.
फिर्यादीने त्यांना विचारणा केली असता सदर इसम यांनी ‘आम्ही पत्रकार आहोत, कुठेही फिरू शकतो, काहीही करू शकतो, तुम्ही विचारणारे कोण’ असे म्हटले. फिर्यादीने त्यांना ओळखपत्र दाखवा अशी विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तर देत फिर्यादीस अश्लील शब्दात शिवीगाळ केली व तुम्ही नोकरी कशी करता, हे पाहतो’ अशी धमकी दिली. या गुन्ह्याच्या प्राथमिक तपासात, गुन्ह्यातील आरोपी मयूर अनिल राईकवार व आरोपी अर्जुन ऊर्फ सन्नी हरविंद्रसिंह धुन्ना असल्याचे निष्पन्न झाले असून पुढील तपास विरुर पोलीस करीत आहेत.
तीन दिवसांपूर्वीच (१४ जुलै) मूल पोलीस ठाण्यांतर्गत भरारी पथक असल्याची व पत्रकार असल्याची बतावणी करणाऱ्या तीन बनावट पोलिस व पत्रकारांना अटक करण्यात आली होती. ते एका व्यक्तीच्या घरी दारू जप्त करून अंडा आम्लेट दुकानात दारू पिताना आढळून आले होते. कारवाईचा धाक दाखवून ते खंडणीही वसूल करत होते. यामध्ये आरोपी बादल दुर्गाप्रसाद दुबे (३६), संगिता बादल दुबे (२७ ) दोन्ही रा. रेंगेपार ता. साकोली जि. भंडारा व अजय विजय उईके (३१) रा. गजानन मंदीर रोड शितला माता मंदीरच्या मागे, चंद्रपूर या तीन आरोपींचा समावेश होता. तर देवेंद्र चरणदास सोनवणे (३०) रा. निलज ता. साकोली जि. भंडारा ह. मु. भिवापूर वार्ड चंद्रपूर हा फरार आहे.
जिल्ह्यात बनावट पोलीस अधिकारी, भरारी पथक तथा पत्रकार बनून लुटणाऱ्यांची एक टोळीच सक्रीय झाली आहे. जिल्ह्यात अवैध व्यवसाय करणाऱ्यांकडे या टोळींचे अधिक लक्ष आहे. त्यांनाच टार्गेट करून त्यांच्याकडून पैसे वसूल करण्याचे काम या टोळीच्या माध्यमातून होत आहे. काही अधिकाऱ्यांविरूध्द बदनामीकारक मजकूर प्रकाशित करण्याची धमकी देवूनही ही टोळी वसूली करत आहे.
ट्रक थांबवून वसुली करण्याचे काम केले नाही. आपण या प्रकरणात निर्दाेष आहोत. माझीच गाडी लक्कडकोट तपासणी नाका येथे अडीच तास थांबवली होती. त्यानंतरही शिवीगाळ केली नाही. या संपूर्ण घटनाक्रमाचे चित्रीकरण आपल्याकडे आहे. याप्रकरणी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन झालेला घटनाक्रम सांगणार आहे. – मयूर राईकवार, जिल्हाध्यक्ष, आम आदमी पक्ष