नागपूर : ऑनलाईन आर्थिक फसवणूकीचे आंतरराज्यिय रॅकेट जेरबंद करण्यात नागपूर पोलिसांना सोमवारी मोठे यश आले. बेरोजगारांना नोकरी, उद्योगाचे आमिष दाखवत त्यांच्याकडून मिळवलेल्या कागदपत्रांच्या आधारे राष्ट्रीयकृत बँकांमध्ये ८० बनावट बँक खाते उघडून बेहिशेबी २१ कोटींची उलाढाल करणाऱ्या २३ जणांच्या टोळीला जेरबंद करत आर्थिक गुन्हे शाखेने ही कामगिरी केली. या टोळीने देशातल्या २१ राज्यांमध्ये कोट्यवधी रुपयांची फसवणूक करत हवाला रक्कम देशाबाहेर पाठवल्याची माहिती पोलिस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल यांनी येथे दिली.
आंतरराष्ट्रीय स्तरावर धागेदोरे जुळलेल्या या टोळीतले दोन मूख्यसूत्रधार फरार असल्याचे नमूद करीत पत्रकारांशी साधलेल्या संवादात पोलीस आयुक्त डॉ. सिंगल म्हणाले, चिन आणि कंबोडियातून हे रॅकेट चालवले जात आहे. या खात्यातून कोट्यवधी रुपयांच्या हवाला रकमेची उलाढाल झाली आहे. त्यासाठी या टोळीने ५० सिमकार्डच्या माध्यमातून उलाढाल केली. कॉल सेंटर प्रमाणे एकाच ठिकाणावरून ही टोळी हवालाच्या कोट्यवधींच्या रक्कमेची बनावट बँक खात्यांमधून उलाढाल करत होते.
नोकरीच्या शोधात नागपुरात आलेल्या गोंदियातील दिनकर घनश्याम गायधने याची फसवणूक करत या टोळीने त्याच्या बँक खात्यातून १ कोटी ७३ लाखांची उलाढाल केली. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर गायधने याने राणा प्रताप नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर या बनावट बँक खाते टोळीचा उलगडा झाला. हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. त्याचा शोध घेतला असता या टोळीने २१ राज्यांमध्ये आतापर्यंत ८० बनावट बँक खात्यांमधून हवालाची २१ कोटींची उलाढाल केल्याचे निदर्शनास आले. गुन्हे शाखेने अटक केलेल्या या टोळीकडून आतापर्यंत १७ लाख ४७ हजारांची रोख जप्त करत ८० बनावट बँक खात्यांमधली ५२ लाख ९९ हजारांची रोख गोठवली आहेत.
बनावट बँक खात्याच्या राज्यात २५ तक्रारी
नागपूरसह राज्यातल्या मुंबई, ठाणे, पुणे, रायगड सारख्या जिल्ह्यांमध्ये शेकडो तरुणांना फसवत त्यांच्या नावे बनावट बँक खाती उघडली आहेत. देशातल्या २१ राज्यांमध्येही त्यांनी केलेल्या फसवणूकीच्या १७४ तर राज्यात २५ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ऑनलाईन फसवणूक प्रकरणात नागपूर पोलिसांच्या सायबर शाखेने चालू वर्षात आर्थिक फसवणूकीचे ९९ गुन्हे दाखल केले आहेत. यातून ४० कोटींपेक्षा अधिक रकमेच्या आर्थिक फसवणूकीपैकी १२ कोटींची रक्कम पोलिसांनी गोठवली असतून ११ कोटी रुपये पिडितांना परत केले आहेत. उर्वरित रक्कम परत मिळवण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे.
१७ पर्यंत कोठडी
गायधने यांच्या तक्रारीनंतर सुरुवातीला सुमित पटले, वैभव बघेल या दोघांना आर्थिक गुन्हे शाखेने जेरबंद केले होते. गुन्ह्याची व्याप्ती पाहता पोलिसांनी रोहित कांबळे, सोहेल सलिम खान, अश्विन भार्गव, अनिलकुमार सर्वेश्वर, सुशांत राऊत, श्रेयस मस्के, पंकज टेटे, शेख मैदूल रहेमान, अजहर शेख सिराज, पंकज विश्वकर्मा, अक्षय काजळे, अभिषेक गुप्ता, दिपक विश्वकर्मा, विजय नरोटे, सुजितसिंह बेदी, सागर बागडे, चंद्रकांत शिरोळे, राहूल जुनी, देवेश वजीर, महेश वजीर, अमर वाघोळकर, आशिष बसेडिया या २३ जणांना अटक केली. न्यायाललयाने या सर्वांना १७ पर्यंत पोलीस कोठडी दिली.
बनावट बँक खात्याचे रॅकेट चालवणारे सायबर गुन्हेगार चीन आणि कंबोडियातून उलाढाल करत आहेत. त्यामुळे देशातली कोट्यवधींची रक्कम आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थलांतरीत केली जात आहे. देशविघातक दहशतवादी कृत्यांसाठी या रकमेचा वापर होत असल्याची शक्यता पाहता त्या दिशेनेही तपास सुरू आहे. – डॉ. रवींद्र कुमार सिंगल, पोलीस आयुक्त
